गेले काही महिने विरोधक आणि डाव्या इकोसिस्टमने एकच धोशा लावला होता की, मोदी घाबरले आहेत. पण ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील प्रतिष्ठित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) मध्ये जे घडले, त्याने या सर्व खोट्या नॅरेटिव्हच्या अक्षरशः ठिकऱ्या उडवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे केवळ एक भाषण नव्हते, तर ती भारताच्या आत्मविश्वासाची आणि सत्याची हुंकार होती.

जेन झी (Gen Z) आणि मोदींची नाळ

SRCC सारख्या देशातील सर्वोच्च महाविद्यालयात शिकणे हे लाखो तरुणांचे स्वप्न असते. अशा या ‘जेन झी’ आणि देशातील अत्यंत गुणवंत विद्यार्थ्यांसमोर मोदींनी सलग ४७ मिनिटे संवाद साधला. या ४७ मिनिटांच्या भाषणात तब्बल ४१ वेळा झालेला टाळ्यांचा कडकडाट तिथल्या भारावलेल्या वातावरणाची साक्ष देत होता. तरुण पिढी मोदींपासून दुरावली आहे, हा विरोधकांचा फुगा या कार्यक्रमाने फोडला. जेन झी आपला खरा नेता कोण आहे, हे अचूक जाणून आहे.

दिमागी नक्सली ते स्पेस स्टेशन: एक स्पष्ट व्हिजन

या भाषणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, पंतप्रधानांनी एकाच वेळी नकारात्मक शक्तींचा समाचार घेतला आणि देशापुढील भव्य स्वप्नेही मांडली. मोदींनी देशाच्या विकासात खोडा घालणाऱ्या शक्तींवर थेट हल्ला चढवला. त्यांनी विरोधकांची अवस्था नाराज फूफा अशी झाली असल्याचे सांगत, देशातील दिमागी नक्सली प्रवृत्तींवर कठोर प्रहार केला.

पण हे करत असताना ते केवळ राजकीय आरोपांवर थांबले नाहीत. त्यांनी विकसित भारताचे स्वप्न तरुणांच्या डोळ्यांत पेरले. कृषी निर्यात, मॅन्युफॅक्चरिंग हब, ऑलिम्पिकचे आयोजन आणि भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याचा संकल्प त्यांनी मांडला. मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्राण पणाला लावा, हा त्यांचा संदेश तरुणांमध्ये ऊर्जा भरणारा होता.

२०१३ मध्ये जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून याच मंचावर आले होते, तेव्हा ते विरोधी पक्षात होते. तरीही त्यांनी त्या मंचावर देशासमोर एक सकारात्मक व्हिजन ठेवले होते. आज १३-१४ वर्षांनंतर ते देशाचे पंतप्रधान म्हणून स्वतःचे रिपोर्ट कार्ड घेऊन तिथे उभे होते. युपीए (UPA) सरकारच्या काळातील पॉलिसी पॅरालिसिस, घोटाळे आणि फ्रॅजाइल फाईव्हच्या गर्तेतून देशाला बाहेर काढून आज देशाची वाढलेली शक्ती दाखवली.

५ सप्टेंबरचा हा दिवस केवळ एका भाषणाचा नाही, तर राजकीय आणि सामाजिक प्रोपोगेंडाला पूर्णपणे बदलून टाकणारा दिवस म्हणून लक्षात राहील. खोट्याची कितीही मोठी गूंज असली, तरी सत्याच्या हुंकारापुढे ती टिकू शकत नाही. SRCC च्या मंचावरून पंतप्रधानांच्या देहबोलीत आणि शब्दांत जी सकारात्मकता होती त्यातून ठाम संदेश आहे, भारत थांबणार नाही, कोणत्याही प्रोपोगेंडा समोर थांबणार नाही!

– दिपक राठोड

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा