नागपूर, दि. 12 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  नागपूर येथे गोंडवाना विद्यापीठासंदर्भात बैठक पार पडली. गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठासाठी 186 एकर जागेत शैक्षणिक संकुल तसेच प्रशासकीय इमारत व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार करण्याच्या संदर्भातील आराखड्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

गोंडवाना विद्यापीठ हे 186 एकर जागेत विकसित करण्यात येत असून यासाठी 27,00,000 चौरस फूट जागा उपलब्ध झाली आहे, हा संपूर्ण परिसर शैक्षणिक व संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करताना पर्यावरणाच्या दृष्टीने हा परिसर समृद्ध असावा. या परिसराच्या विकासासाठी ₹1100 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी केंद्र व राज्य शासनातर्फे ₹157 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

गडचिरोली परिसरात औद्योगिक विकासाला पोषक वातावरण निर्माण होत असतानाच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व संशोधन उपक्रमांनाही प्रोत्साहन मिळणार आहे, या दृष्टीने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या नवीन इमारतीची रचना करताना गोंड वास्तुकलेचा वारसा जपतानाच आधुनिक शैलीचा संगम असावा, त्या दृष्टीने देशातील व राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक परिसर असलेल्या इमारतींचा अभ्यास करून सर्वोत्कृष्ट परिसर विकसित करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या परिसरात पर्यावरणपूरक हरित इमारत, ऊर्जा बचत, विविध 27 शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या इमारती, कृत्रिम पाणवठे, सहा कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता, वनौषधी उद्यान व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा