यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करणार
नागपूर, दि. 28 : राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर-३ अंतर्गत मदत देण्यात येईल, दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती व शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस आज माध्यमांसोबत बोलत होते.
पर्जन्यमानाची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, या तालुक्यांमध्ये १२ उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकाच्या नुकसानीची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून दिली जाईल, अशी ग्वाही देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या तालुक्यांचा समावेश झाला नाही, अशा सर्व तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर-३ मध्ये समावेश करण्यात येईल.
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येईल. राज्यातील बहुतांश प्रकल्पांत पिण्याचे पाणी उपलब्ध असून, जुलै-ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवून अतिरिक्त उपलब्ध असलेले पाणी व पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बीसाठी देता येईल का, याचाही प्राधान्याने विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अल निनोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात येऊन फेब्रुवारीअखेरपर्यंत उच्चांक पातळी गाठण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना जनतेनेही सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागांमध्ये कशी मदत करता येईल, ती सर्वांनी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे छत्तीसगडमध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीत प्रशासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येत असून, मी प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असल्याचे सांगताना पूरपरिस्थिती निवळत असून, जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.








































































































