महामार्गांवर चार्जिंग सुविधांचे जाळे उभारणार

पुणे, दि. 31 : स्वच्छ आणि हरित वाहतूक व्यवस्था ही विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्राची प्रमुख प्राथमिकता आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, पुण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ही शहरे ईव्ही उद्योगाची महत्त्वाची केंद्रे बनत आहेत. येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुण्यात ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समुहाच्या सहा नवीन उत्पादन सुविधांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, बी. एल. संतोष, ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, ईका मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता आणि सुनंदा मेहता यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून प्रदूषण आणि जीवाश्म इंधनावरील आयात कमी करण्यास मदत होणार आहे. ऑटोमोबाईल उद्योग हा रोजगारनिर्मिती आणि पूरक उद्योगांच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे. तीन वर्षांत महाराष्ट्राला ५० हजार इलेक्ट्रिक बसची आवश्यकता असून, राज्यातील उद्योगांनी ही मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवावी असे आवाहन त्यांनी केले.

इलेक्ट्रिक वाहनांच्या विस्तारासाठी हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यावर राज्याचा भर असून, आगामी काळात वीज निर्मितीमध्ये हरित ऊर्जेचा वाटा वाढविण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सक्षम चार्जिंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने सर्वंकष आराखडा तयार केला आहे. वाहन उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने राज्यातील प्रमुख महामार्गांवर चार्जिंग सुविधांचे जाळे उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक जागा, परवानग्या आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पिनॅकल समूहाच्या एका उत्पादन सुविधेत ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून, त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी देण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचारी हा कंपनीचा भागधारक असण्याचे मॉडेलही कौतुकास्पद असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. पिनॅकल समूहाच्या नव्या उत्पादन सुविधांमुळे महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी राज्यातच पूर्ण होण्यास मदत होईल आणि महाराष्ट्र ईव्ही निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारताने जागतिक नेतृत्व करावे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असून, ऑटोमोबाईल उद्योग हा भारतीय औद्योगिक क्षेत्राचा कणा आहे. देशातील वाहन उद्योगाचा विस्तार, रोजगारनिर्मिती आणि निर्यातीत मोठे योगदान आहे. त्यामुळे भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने जागतिक स्तरावर अग्रस्थान मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवावे. इलेक्ट्रिक वाहने, ट्रक आणि बस निर्मितीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

भारताची जीवाश्म इंधनावरील आयात कमी करून स्वदेशी पर्यायी इंधन, जैवइंधन, इथेनॉल आणि हायड्रोजनच्या वापराला प्रोत्साहन देणे ही केंद्र सरकारची भूमिका आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत उत्पादन क्षमता वाढविण्याची गरज असून, विशेषतः इलेक्ट्रिक बस आणि ट्रक निर्मितीत मोठी संधी आहे. वाहन उद्योगाने बॅटरी, संशोधन, नवकल्पना आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासावर भर द्यावा. शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता आणि इंधनदाताही व्हावे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा अधिक किफायतशीर करण्याबरोबरच लॉजिस्टिक खर्च, प्रदूषण आणि इंधन आयात कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. भारताने शंभर टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

गडकरी पुढे म्हणाले की, वाहन उद्योगातील बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना स्टार्टअप, तरुण अभियंते, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांना उद्योगाशी जोडणे महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रिक ट्रकच्या निर्मितीत बॅटरीचे वजन लक्षात घेऊन वाहनांची मालवाहतूक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीनेही तंत्रज्ञान विकसित करता येईल. तसेच महामार्गांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधांचा विस्तार आणि वीजदर कमी करण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न आवश्यक आहेत. आगामी काळात शंभर टक्के जैवइथेनॉलवर चालणारी वाहने तसेच हायड्रोजनवर आधारित ट्रक बाजारात येतील. पर्यायी इंधन आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर भारताला आत्मनिर्भर बनविण्यासह देशाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी, उद्योजक तसेच नागरिक उपस्थित होते.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा