मुंबई, दि. 18 : चौदा कोटी जनतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. देवेंद्रजी दिल्लीला जातील, अशी कितीही भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली तरी त्यांची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. आधी आपल्या मालकांची आणि पक्षाची काय वाट लागली ते पहा आणि मग देवेंद्रजींवर बोला. तुमची कितीही इच्छा असली तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘महाराष्ट्र की यही पुकार, अब की बार देवाभाऊ की सरकार,’ असे म्हणत महाराष्ट्राने देवेंद्रजींना निवडून दिले. संजय राऊत, तुम्ही सांगितले होते की 25 वर्षं महाविकास आघाडीचे सरकार राहील. तुम्हाला 25 महिनेही तुमचे सरकार टिकवता आले नाही आणि तुम्ही देवेंद्रजींबद्दल भविष्यवाणी करत आहात. राष्ट्राची पुकार ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसाठी तर महाराष्ट्राची पुकार ही देवाभाऊंसाठी आहे. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस दिल्लीला जातील, केंद्रीय मंत्री होतील अशी कितीही स्वप्ने पाहिलीत तरी ती पूर्ण होणार नाहीत. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी देवाभाऊ सक्षम आहेत, असे श्री. बन म्हणाले.

मी पुन्हा येईन, असे देवाभाऊ म्हणाले तेव्हा ते एकटे आले नाहीत तर पुर्ण बहुमतासह पुन्हा आले. एकतर तू राहशील किंवा मी राहीन, म्हणणाऱ्या उद्धवजी ठाकरेंची महाराष्ट्राने काय अवस्था केली आणि मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना महाराष्ट्राने 2024 ला पुन्हा निवडून दिले. देवेंद्रजी फडणवीस जे सांगतात, ते पूर्ण होते. तुमच्यासारखे खोटे बोलण्याची सवय देवाभाऊंना नाही, असे श्री बन यांनी सुनावले.

शिंदे गट आणि भाजपाची दरी शोधण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि तुमच्यात किती दरी निर्माण झाली आहे, ते पहा, असे म्हणत श्री. बन पुढे म्हणाले, महाराष्ट्रातल्या जनतेने उबाठा गटाला दरीत टाकले आणि तुम्ही दरीची भाषा करता. अख्खा उबाठा गट दरीत ढकलून दिला गेला आणि दरीमधून निघायला तुम्हाला वेळ नाही. मातोश्रीच्या दरीत अडीच वर्षे कोण बसले होते? त्यामुळे आपली काय अवस्था झाली आहे, याचा विचार संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांनी करावा.

महाराष्ट्रात अराजकता निर्माण व्हावी, पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे आंदोलन व्हावे, यासाठी रोहित पवार प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पारदर्शकतेने महाराष्ट्रात परीक्षा होत आहेत, निकाल लागत आहेत आणि विद्यार्थ्यांची भरती होत असल्याचे लक्षात आल्याने ते विद्यार्थी या आंदोलनाला बळी पडले नाहीत. आता इतर काही परीक्षा सुरु आहेत, त्यात ते नाक खुपसत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात रोहित पवार त्या सरकारमध्ये आमदार असताना ‘एमपीएससी’सह अनेक पेपर फुटले होते तेव्हा रोहित पवार काही करू शकले नव्हते, हे विद्यार्थ्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवावर उड्या मारण्याचा प्रयत्न करू नये. हे विद्यार्थी तुमच्या अजेंड्याला बळी पडणार नाहीत, असे श्री. बन यांनी निक्षून सांगितले.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा