मुंबई, दि. 20 : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने जनाब संजय राऊतांना मिरची झोंबली आहे. संजय राऊत, अभी तो ये शुरुआत है. येत्या काळात तुम्हाला अनेक मिरच्या झोंबणार आहेत, कारण असे अनेक विक्रम महाराष्ट्राच्या आणि मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नावावर होत उद्या जगभरातून महाराष्ट्रातल्या चांगल्या कामाचे कौतुक होणार आहे. तुमचे मालक अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना तुमच्यासोबत असलेल्या शरद पवार साहेबांनाही तुमचे कौतुक करावेसे वाटले नाही. उलट त्यांनी तुमच्यावर टीका केली होती. हे एकदा संजय राऊतांनी आठवावे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देवेंद्रजी फडणवीस यशस्वी मुख्यमंत्री असल्याचा निकाल जनतेने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राला दिलेला आहे. संजय राऊत, तुमचे मालक अयशस्वी होते. तुमचे मालक घरबशा होते. टीका केली तर लोकांना तुरुंगात डांबणारे होते. लोकांची घरे तोडणारे होते. पत्रकारांना अटक करणारे होते. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या आशीर्वादाने झालेले मुख्यमंत्री आहेत. तुमच्यासारखे ते पाठीत खंजीर खुपसून, हिंदुत्वाशी गद्दारी करून, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला ठेवून मुख्यमंत्री झालेले नाहीत. मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू प्रकल्प, मुंबईकरांना बीडीडी चाळीत हक्काचे घर स्वस्तात देणारे यशस्वी मुख्यमंत्री आहेत. तर मुंबईला लुटणारे अयशस्वी मुख्यमंत्री असतात, अशा शब्दात श्री. बन यांनी झोडपले.

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी म्हणजे शिवसेना गोठवण्याची, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार गोठवण्याची मागणी असल्याचे सांगत श्री. बन म्हणाले, संजय राऊतांनी हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांचे विचार गोठवण्याची सुपारी घेतल्यानेच त्यांनी न्यायालयात धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. कारण संजय राऊतांचे आता बाळासाहेबांच्या विचारांवर नाही तर राहुल गांधींच्या विचारांवर प्रेम आहे. हिंदुत्ववादी विचारांवर नाही तर समाजवादी पार्टीच्या विचारांवर प्रेम आहे. रामभक्तांवर गोळ्या झाडणाऱ्या समाजवादी पार्टीच्या विचारांवर प्रेम करण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतल्याने धनुष्यबाण गोठवा, अशी दुर्दैवी मागणी न्यायालयात उबाठा गटाकडून करण्यात आली. परंतु संजय राऊत, तुम्हीच काय, अजून कोणीही आले तरी हिंदुत्वाचे विचार गोठवले जाऊ शकत नाहीत. कारण बाळासाहेबांनी उचललेले ते शिवधनुष्य गोठवण्याची आणि त्याला नामशेष करण्याची ताकद जनाब संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे, तुमच्यात नाही.

झेन जी आणि फर्स्ट टाइम वोटर हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत. संजय राऊत, तुम्ही शिवतीर्थावर झेन जीच्या समर्थनार्थ आंदोलन केले तेव्हा उद्धवजी ठाकरे झिंदाबादच्या घोषणा द्यायला एकही तरुण तयार नव्हता. कारण इथल्या झेन जीला माहित आहे की, संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांचा अजेंडा हा सर्वसामान्य घरातल्या तरुणांना मोठे करण्याचा नाही तर आदित्य ठाकरेंचे करिअर सेट करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवाभाऊंचा अजेंडा हा महाराष्ट्रातल्या तरुणांचे करिअर सेट करण्याचा असल्याचे श्री. बन यांनी सुनावले.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा