वित्तीय क्षेत्राला मिळणार नवी गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये विश्वास

मुंबई, दि. 10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026’ कार्यक्रमात ‘पोटेन्शियल टू इम्पॅक्ट: एजेंटिक एआय – टोकनायझेशन – क्वांटम’ या विषयावर संबोधन केले.

डिजिटल वित्तीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असून, एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गतवर्षी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये महाराष्ट्राला देशातील पहिले ‘टोकनाइज्ड स्टेट’ बनविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला होता. त्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘महाराष्ट्र डिजिटायझेशन अँड एक्स्चेंज ऑफ लँड टोकन ॲसेट ॲक्ट (डेल्टा ॲक्ट)’ ची रूपरेषा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कायद्याद्वारे जमीन आणि स्थावर मालमत्तेच्या ब्लॉकचेन-आधारित टोकनायझेशनसाठी आवश्यक कायदेशीर चौकट निर्माण करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सेबी, बीएसई, एनएसई, उद्योग, तंत्रज्ञान, कायदा आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग सुनिश्चित करण्यात येत आहे. टोकनायझेशन ही स्थावर मालमत्तेमध्ये अडकलेले भांडवल उत्पादक आर्थिक संधींमध्ये रूपांतरित करण्यासाठीची प्रक्रिया आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल, तरलता निर्माण होईल आणि निष्क्रिय संपत्ती आर्थिक विकासासाठी उपयोगात आणता येईल.

जागतिक पातळीवरील वित्तीय क्षेत्राचे भविष्य आता भारतात आणि विशेषतः मुंबईत सुद्धा घडत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई जगातील उदयोन्मुख फिनटेक राजधानी म्हणूनही वेगाने पुढे येत आहे. ‘पोटेन्शियल ऑफ इम्पॅक्ट’ ही यंदाच्या ग्लोबल फिनटेक फेस्टची संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण असून, तंत्रज्ञानातील क्षमता प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतरित करणे ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (युपीआय) माध्यमातून भारताने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. आता पुढील टप्प्यात कर्ज, गुंतवणूक, मालकी हक्क आणि वित्तीय माहितीचे लोकशाहीकरण करण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूरमधील उद्योग, विदर्भातील शेतकरी किंवा पुण्यातील महिला उद्योजक यांनाही मोठ्या वित्तीय संस्थांप्रमाणेच दर्जेदार आर्थिक माहिती आणि सेवा उपलब्ध करून देण्याची क्षमता नव्या तंत्रज्ञानात असून एजेंटिक एआयच्या माध्यमातून वित्तीय सेवांना नवी दिशा मिळणार आहे. भविष्यात एखाद्या उद्योजकाचा एआय सहाय्यक त्याच्या आर्थिक गरजा ओळखून योग्य वित्तीय पर्याय सुचवू शकेल. शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत आर्थिक सल्ला मिळू शकेल. मात्र, एआय नागरिकांसाठी काम करत असले तरी अंतिम नियंत्रण नागरिकांच्याच हातात राहिले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील वित्तीय, तांत्रिक आणि पायाभूत सुविधांच्या सामर्थ्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई देशातील सर्वात मोठी वित्तीय परिसंस्था प्रदान करते, पुणे उत्कृष्ट तांत्रिक आणि अभियांत्रिकी कौशल्याचे केंद्र आहे, तर नवी मुंबई डेटा, पायाभूत सुविधा आणि जागतिक कनेक्टिव्हिटीचे नवे केंद्र म्हणून विकसित होत आहे. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर्स, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स, स्टार्टअप्स, विद्यापीठे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाभोवती सक्षम परिसंस्था उभी राहत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्राने महाराष्ट्राकडे केवळ बाजारपेठ म्हणून न पाहता नवकल्पनांची प्रयोगशाळा म्हणून पाहावे, असे आवाहन करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृषी, एमएसएमई, शहरी विकास, आरोग्य, गतिशीलता, आर्थिक समावेशन, फसवणूक प्रतिबंध आणि सार्वजनिक वित्त व्यवस्थापन या क्षेत्रांतील अभिनव उपाय राज्य शासनासमोर मांडावेत, त्यांची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यासाठी सरकार पूर्ण सहकार्य करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगाला डिजिटल वित्तीय पायाभूत सुविधांचा नवा आदर्श दिला आहे. आता भारत पुढे कोणती नवी वित्तीय क्रांती घडवून आणणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र या परिवर्तनाचा अग्रदूत राहील आणि देशातील पुढील पिढीच्या फिनटेक उपाययोजनांसाठी सर्वात मोठे ‘रिअल वर्ल्ड टेस्टबेड’ म्हणून विकसित होईल. मुंबईला जगाची फिनटेक राजधानी बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. सर्वोत्तम कल्पना जगात कुठूनही येऊ शकतात. त्या महाराष्ट्रात आणि मुंबईत सिद्ध करून जगासमोर मांडूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी GFF 2026 चे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन, NPCI च्या ग्रोथ विभागाच्या कार्यकारी संचालिका सोहिनी राजोला, RBI चे माजी कार्यकारी संचालक जी. पद्मनाभन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा