LATEST NEWS

 

ठाणे, दि 2 : विरोधकांच्या एसआयआरविरोधातील आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीने रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी ‘लोकतंत्र बचाओ’ पदयात्रेला सुरुवात केली. या पदयात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ‘काँग्रेसची अराजकता उखडून फेकू,’ असा नारा देत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर संविधानाची मोडतोड केल्याचा आणि चीनच्या पाठिंब्यावर भारतात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

ही पदयात्रा केवळ आवाज उठविण्यापुरती मर्यादित नव्हती, तर भारताची राज्यघटना, लोकशाही मूल्ये आणि घटनात्मक संस्थांचे रक्षण करण्याच्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक होती. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष राज्यघटना व लोकशाहीच्या रक्षणाचा केवळ दिखावा करत असून, त्याच आडून घटनात्मक संस्थांना लक्ष्य करून देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील आणीबाणीचा काळ हा आजही सर्वांत काळ्या अध्यायांपैकी एक आहे. संसद, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांसारख्या महत्त्वपूर्ण संस्थांचे महत्त्व कमी करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांवर तीव्र टीका केली. या संस्थांचे स्वातंत्र्य अबाधित राखणे आणि लोकशाहीवरील जनतेचा विश्वास कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) काँग्रेसकडून होत असलेल्या विरोधावरही प्रश्न उपस्थित केले. यापूर्वीही, काँग्रेसच्या सरकारांच्या कार्यकाळासह, अशा प्रकारची प्रक्रिया आठ वेळा राबविण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधले. तसेच, प्रत्येक मतदान केंद्रावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना बूथ लेव्हल एजंट (BLO) नियुक्त करण्याचा अधिकार असून, त्यांच्यामार्फत मतदार याद्यांची तपासणी आणि चुकीच्या नोंदींवर हरकती नोंदविता येतात. यामुळे मतदार यादी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता सुनिश्चित होते.

काँग्रेसचे धोरण एका हातात लाल संविधान ठेवायचे आणि दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने निर्माण केलेल्या घटनात्मक संस्थांना बदनाम करायचे, असे आहे. संविधान खराब आहे, असे म्हटल्यास लोक आपल्याला जाब विचारतील, याची काँग्रेसला जाणीव आहे. त्यामुळेच घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचे काम केले जात आहे असा आरोप त्यांनी केला.

राज्यघटना आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीच्या निर्णायक लढ्याची ही पदयात्रा म्हणजे सुरुवात आहे. प्रत्येक नागरिकाने या आंदोलनात सहभागी होऊन लोकशाही मूल्यांचे रक्षण करावे आणि घटनात्मक संस्थांना कमकुवत करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाविरोधात एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईकजी, मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, राज्य विधिमंडळाचे सदस्य, भाजप-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा