भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई, दि. 19 : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी व्हावी यासाठी जनाब संजय राऊत जाणीवपूर्वक प्रयत्न करताहेत. ऑर्थर रोड तुरुंगात असताना आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मदत केली नाही त्याचा बदला म्हणून वारंवार दिशा सालियन प्रकरणावर बोलून ते ताजे ठेवायचे आणि आदित्य ठाकरेंना राजकीय पटलावरून दूर करायचे संजय राऊत यांचे षडयंत्र असल्याचा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला.
कणकवलीत किती लोकांचे कुणी खून केले याचे पुरावे होते तर महाविकास आघाडीचे अडीच वर्ष सरकार असताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे झोपा काढत होते का? तेव्हा याबद्दल चौकशी करण्याचे आदेश तुम्ही का दिले नाहीत? तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते सादर करा. कोर्ट, सीबीआय, सर्वोच्च न्यायालयात जा. कुठलेही पुरावे नसताना वायफळ बडबड करण्याची सवय संजय राऊत यांना आहे. तुमच्याकडे पुरावेच नाहीत त्यामुळे विनाकारण राणे कुटुंबावर आरोप करण्यापेक्षा आधी आपल्याकडे काही पुरावे आहेत का ते तपासा आणि मग इतरांवर टीकाटिप्पणी करा, असे श्री. बन यांनी सुनावले.
श्री. बन पुढे म्हणाले, ममता बॅनर्जी यांना फुटबॉल चिन्ह मिळाले. पण जनतेने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा फुटबॉल केलाय. जनता इकडून तिकडे फुटबॉलसारखे तुम्हाला टोलवते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक आयोग गडी नाही तर संजय राऊत तुम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे गुलाम आणि घरगडी झाला आहात. राहुल गांधी यांची गुलामी करायची एवढेच तुम्हाला माहित आहे आणि जनतेने तुम्हाला फुटबॉलसारखे लाथा मारून घरी बसवल्याने निवडणूक आयोगावर टीका करण्याआधी आत्मपरीक्षण केले तर बरे होईल.
संजय राऊत, सूर्य मावळतो हे खरे असले तरी तुमचा सूर्य नाही तर तुमची अगरबत्ती आहे आणि ती महाराष्ट्रातल्या जनतेने आधीच विझवली आहे. त्यामुळे मोहनजी भागवत, मोदीजींवर टीका करायची, एपस्टीन फाईलच्या गप्पा करण्यापेक्षा समोर आलेल्या पाटकर फाईलमध्ये तुमचे तोंड काळे झालेय त्याचा इतिहास पहा. जनतेने तुम्हाला घरी बसवत मोदीजींना तिसऱ्यांदा निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2029 मध्येही पंतप्रधान होतील. तुमचे मालक 2029 ला आमदारही होऊ शकणार नाहीत, असे श्री. बन यांनी फटकारले.
संजय राऊत, लोक रस्त्यावर नाहीत तर लोकांनी तुम्हाला रस्त्यावर आणले आहे. तुम्ही सत्ता चालवण्याच्या लायकीचे नाहीत. पक्ष चालवण्याची पात्रता तुमच्याकडे नसल्याने लोकांनी तुम्हाला रस्त्यावर आणून सोडले. राहुल गांधींचे कितीही कौतुक करा. ते तुम्हाला 2028 मध्ये खासदारकी देणार नाहीत, असे श्री. बन म्हणाले.
‘‘यूपीआय” कराचा सामान्य माणसाला फटका बसणार नाही
”यूपीआय” बाबत केंद्र सरकारने अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. फक्त व्यापाराला कर लावलाय. सर्वसामान्य नागरिकांना कुठलीही झळ बसत नाही. तरीही तुम्ही सांगताहात की लोक रस्त्यावर येतात. लोकांची काळजी करू नका. जनतेचे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहेत. अशीच बडबड करत राहिलात तर येत्या काळात कपडे फाडत तुम्हाला रस्त्यावर फिरावे लागेल अशी अवस्था जनताच तुमची करणार आहे, अशी खरडपट्टी श्री. बन यांनी काढली.















































































