भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा बोचरी टीका
मुंबई, दि. 18 : जनाब संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी 140 कोटी जनतेचे आशीर्वाद असल्याने त्यांच्या ग्रहदशेची चिंता करण्याची जबाबदारी देशाची आहे. दिवे लावण्याची भारतीय परंपरा भाजपा पुढे नेत आहे. मात्र दिवे विझवून पक्ष संपवणे, आपल्या मालकाचे करिअर उद्ध्वस्त करणे ही तुमची परंपरा आहे. पंतप्रधान मोदीजींची ग्रहदशा पाहण्यापेक्षा आदित्य ठाकरे आणि मातोश्रीचे ग्रह कसे फिरलेत याचे आत्मचिंतन करा, अशी बोचरी टीका भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली.
लोकशाहीत जनता हा लोकशाहीचा आत्मा असतो आणि जनता खरी शिवसेना आणि एकनाथजी शिंदे यांच्यासोबत असल्याने लोकशाहीचा आत्मा त्यांच्याचसोबत आहे. तुम्ही राहुल गांधी आणि काँग्रेसचे घरगडी म्हणून काम करताहात, हा इतिहास महाराष्ट्राला माहित आहे. ममता बॅनर्जी यांचे चिन्ह गोठवल्याने तुम्हाला पोटशूळ उठलाय. परंतु ममतादीदी आणि उद्धवजी ठाकरेंसोबतही जनमत नव्हते. राहिला प्रश्न निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याचा तर सर्वात मोठे घोटाळेबाज तुम्हीच असल्याने तुम्ही घोटाळ्यांबाबत न बोललेलेच बरे, असे श्री. बन यांनी सुनावले.
श्री. बन पुढे म्हणाले, उबाठा गट काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी तुम्ही शेकडो कोटी रुपयांची डील केली. राहुल गांधींकडून त्याची पहिली असाइनमेंटही तुम्ही घेतली आणि आता उबाठा गट पूर्णपणे काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून केला जातोय. त्यामुळे निवडणूक आयोगाने किती रुपयांची डील केली, हे सांगण्यापेक्षा तुम्ही उबाठा गट काँग्रेसमध्ये विसर्जित करण्यासाठी किती हजार कोटी रुपयांची डील केली आणि त्याचा पहिला हप्ता तुम्ही मागच्याच आठवड्यात राहुल गांधींना भेटून कसा घेतला, याचा खुलासा एकदा महाराष्ट्रासमोर करा आणि त्यानंतर इतरांवर टीका करा.
दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करू नये. 2019 ला महायुतीसोबत निवडणूक लढून मतांवर दरोडा टाकत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद मिळवले. याला जनमतावर दरोडा टाकला म्हणतात. तेव्हा देवाभाऊंच्या नावावर मते मागितली आणि मुख्यमंत्री होण्याची वेळ आल्यानंतर उद्धवजी ठाकरे यांनी आपला पक्ष विकत काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसलात. चोर कोण आणि दरोडेखोरांचे सरदार तुमचे मालक उद्धवजी ठाकरे कोण, हे महाराष्ट्राने ओळखल्यानेच जनतेने 2024 साली त्यांना घरी बसवले. 2029 मध्येही महाराष्ट्रातील जनता त्यांना पुन्हा घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकेची झोड श्री. बन यांनी उठवली.
दुष्काळासंदर्भात माननीय शरद पवार साहेबांनी देवेंद्रजींना पत्र लिहिले आणि संजय राऊतही दुष्काळ निवारणाचा सल्ला देतात. पवार साहेबांच्या काळात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत होत्या. पवारसाहेब ज्येष्ठ असल्याने त्यांच्या सूचनांचा विचार सरकार निश्चितपणे करेल. देवाभाऊ आणि महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी देवाभाऊंनी केलीय. 5 ऑक्टोबरनंतर पाहणी करून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला जाईल. तुम्ही बांधावर जाऊन घोषणा केली, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कवडीही दिली नाहीत, हा तुमचा इतिहास आहे, असे श्री. बन यांनी फटकारले.













































































