नागपूर, दि. 21 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी १९ सप्टेंबर रोजी नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौकादरम्यानच्या ‘डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुला’च्या लोकार्पण व नामकरण कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली.
पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूर शहराला सुव्यवस्थित शहराचे स्वरुप देण्याचा प्रयत्न होत असून शहराच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने देखील व्यापक प्रमाणात प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा उड्डाणपूल साकारण्यात आला असून तो विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. या उड्डाणपुलामुळे शहराच्या व्यापक भागातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा उड्डाणपूल अभियांत्रिकीचा सर्वोत्तम नमूना आहे. रा. स्व. संघाच्या शताब्दीपूर्तीच्या पार्श्वभूमीवर या उड्डाणपुलास आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्याचे पाऊल अतिशय महत्त्वाचे असून या माध्यमातून नागपूरची एक ओळखही जपली जात आहे.
नागपूर शहरात आतापर्यंत 35 उड्डाणपूल झाले आहेत. तर आणखी 15 प्रस्तावित आहेत, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा पर्यावरणपूरक आधुनिक प्रकल्प साकारला जात आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे शहरातील खड्ड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. बाह्य रिंगरोडचे काम पूर्ण झाल्यावर आता भविष्यात शहराचा होणारा विस्तार लक्षात घेऊन आणखी एक रिंगरोड तयार केला जाणार आहे. सुमारे 2000 एकर क्षेत्रात रोजगार केंद्रित असे नवीन नागपूर विकसित करण्याचे नियोजन आहे. नागपूरकडे आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून पाहिले जात आहे. एक शाश्वत शहर म्हणून नागपूरचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिपादन केले.
असा आहे हा उड्डाणपूल
सुमारे ₹998 कोटींच्या 8.90 किलो मीटरच्या या डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुलासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे शहरातील अनेक भागांतील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार असून जलद वाहतुकीला चालना मिळणार आहे. या उड्डाणपुलाच्या मार्गात अनेक ठिकाणी रॅम्पची सुविधा देण्यात आल्याने वाहतूक सुरळीत होण्यासह रस्त्यांच्या कनेक्टिव्हीटीला मोठी मदत होणार आहे. उड्डाणपुलाच्या मार्गात अशोक चौक येथे भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतिवर आधारित 22 म्यूरल्स बसविण्यात आले आहेत.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

































































































