मुंबई, दि. 12 : “देशात अराजकत्ता पसरवून कडव्या डाव्या विचारांची व्यवस्था प्रस्थापित करण्याची जणू स्पर्धाच काँग्रेस आणि ‘कॉकरोच जनता पार्टी यांच्यात सुरू आहे.” असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सीजेपीच्या आंदोलनामागे राजकीय हेतू आहे, असे सांगत सीजेपीच्या विचारसरणीवर त्यांनी टीका केली. विरोधकांची वैचारिक लढाई कमकुवत झाल्याने ते विविध मुद्यांचा आधार घेऊन राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन करण्याच्या अधिकाराला विरोध नाही, मात्र, आंदोलनाच्या नावाखाली कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे किंवा व्यक्तीविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणे, हे अराजकतेचे स्वरूप आहे असे ते म्हणाले.
फडणवीस यांनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना “आंदोलनांचे दोन प्रकार आहेत,” असे सांगितले. “नागरिकांच्या वास्तविक समस्यांवर आधारित आंदोलने आणि राजकीय हेतूने आयोजित केलेली आंदोलने,” असा भेद त्यांनी स्पष्ट केला. “शेतकरी, आदिवासी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर होणारी आंदोलने वास्तविक समस्यांमधून उभी राहू शकतात; मात्र काही संघटना अशा प्रश्नांचा व्यापक राजकीय ‘अजेंडा’ पुढे नेण्यासाठी वापर करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस आणि सीजेपी या संघटना भारतीय राज्यघटनेचा उल्लेख करतात. मात्र, त्या माध्यमातून स्थापन झालेल्या संविधानिक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करतात. भारतीय रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग, सर्वोच न्यायालय आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक यांसारख्या संस्थांविषयी जनमानसांत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे,” याकडे मुख्यमंत्र्यांनी खास लक्ष वेधले. दिल्लीतील ‘जंतरमंतर’ येथील आंदोलनाचा संदर्भ देताना त्यांनी “आंदोलन करण्याच्या अधिकाराला विरोध नाही,” असे स्पष्ट केले.


















































































































































