वर्षभरात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
मुंबई, दि. 8 : मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या मुंबई मेट्रो-३, अर्थात ‘अॅक्वा लाईन’ मेट्रो मार्गिकेने सात कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना या मार्गिकेवर आतापर्यंत ७ कोटी २० लाख ८८ हजार ७३८ प्रवाशांची नोंद झाली आहे. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका म्हणून या मार्गिकेला मुंबईकरांचा वाढता प्रतित्ताद मिळत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
सप्टेंबरमध्ये या मार्गिकेची प्रवासी संख्या लक्षणीय राहिली, कामकाजाच्या दिवशी दररोज सरासरी २ लाख २४ हजार ६०२ प्रवाशांनी, तर शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी सरासरी १ लाख ३१ हजार १३८ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील या मार्गिकेचे महत्त्व
दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या निमित्ताने ‘मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळा’कडून दोन विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये ‘अॅक्वा लाईन टाईम कॅप्सूल’ हा विशेष उपक्रम लक्षवेधी ठरणार आहे. भारतातील मेट्रो क्षेत्रात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे ‘एमएमआरसीएल’कडून सांगण्यात आले. यात मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोच्या उभारणीपासून प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होईपर्यंतचे महत्त्वाचे टप्पे, छायाचित्रे, नोंदी, स्मृती आणि विविध आठवणी जतन करण्यात येणार आहेत. त्यामुळे सन २०२६ मधील मुंबई आणि मेट्रो-३च्या प्रवासाची ऐतिहासिक नोंद भविष्यातील पिढ्यांसाठी जतन होणार आहे.
प्रवाशांना मेट्रोच्या प्रवासासोबत वेगळा अनुभव देण्यासाठी ‘अॅक्वा लाईन पासपोर्ट अॅण्ड स्टॉम्प ट्रेल’ सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवाशांना मार्गिकेवरील निश्चित स्थानकांना भेट देऊन, तेथील विशेष स्वरूपाचे शिक्के आपल्या प्रवासी पुस्तिकेत जमा करता येणार आहेत. प्रवासी, तसेच पर्यटनप्रेमींसाठी हा उपक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
अभियांत्रिकी आविष्कार
‘एमएमआरसीएल’ च्या संपूर्ण टीमचे आणि मुंबईकरांचे अभिनंदन, मेट्रो ३ने सात कोटींचा टप्पा पार केला, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. हा केवळ एक आकडा नाही, सुरक्षित आणि वेगवान प्रवासावर मुंबईकरांनी व्यक्त केलेला विश्वास आहे. आरे ते कफ परेड ही मार्गिका भारतातील सर्वाधिक लांबीची भूमिगत मार्गिका आहे. हा एक अभियांत्रिकी अविष्कार आहे.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईकरांच्या विश्वासाचे फलित
संपूर्ण मार्गावरील मेट्रो सेवेला एक वर्ष पूर्ण होत असताना मुंबईकरांनी या मार्गिकेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविले, याचा मनस्वी आनंद आहे. सात कोटी प्रवासी टप्पा हा मुंबईकरांचा विश्वास आणि पाठिंब्याचा पुरावा आहे. टाईम कॅप्सूल आणि पासपोर्ट व शिक्का संकलन, उपक्रमाच्या माध्यमातून या सामूहिक प्रवासाच्या आठवणी भविष्यासाठी जतन करण्याचा प्रयत्न आहे.
– व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ अधिनी भिडे




















































































































































