मुंबई, दि. 26 : गडचिरोली जिल्हा स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांतून  शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले, गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज, 26 ऑगस्ट रोजी 44 वर्षे पूर्ण झाली. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो.

गडचिरोली जिल्हा कायम माझ्या हृदयात वेगळे स्थान असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहिलो आहोत. आज मला सांगताना आनंद होतो की, हा जिल्हा आज माओवादमुक्त आहे आणि ती ओळख पुसून तो आता देशाचे ग्रीन स्टील हब म्हणून उदयास येत आहे.

2014 पासून या जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न आम्ही केले. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. आज कोट्यवधींची गुंतवणूक या जिल्ह्यात येत आहे. उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा निर्मिती याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे केवळ गडचिरोलीच नाही, तर लगतच्या परिसरातील युवांना रोजगार देणारा हा जिल्हा ठरेल. हे करीत असताना जल, जमीन, जंगल आणि पर्यावरण यांचे संवर्धनही तेवढ्याच गांभीर्याने केले जात आहे. मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वेमार्ग, रस्त्यांची कामे व शिक्षणाच्या सुविधा अशा सर्व बाबतीत गडचिरोली जिल्हा वेगाने प्रगती करत आहे. अर्थात, याचे सारे श्रेय गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना जाते. त्यांनी या प्रक्रियेत जी भक्कम साथ दिली, त्याचेच हे फळ आहे. आपण सोबत मिळून गडचिरोलीच्या विकासात आणखी नवी भर घालूया. या प्रयत्नात तुमचे सहकार्य असेच असू द्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गडचिरोली जिल्हा स्थापना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा