मुंबई, दि. 4 : महाराष्ट्रातला सार्वजनिक गणेशोत्सव बंद झाला तर हिंदू एकत्र येणार नाहीत यादृष्टीने जनाब संजय राऊत प्रयत्न करत आहेत. होळी आली की ती पर्यावरणपूरक साजरी केली पाहिजे असे सांगतात. मात्र मोहर्रमविरोधात बोंब मारत नाहीत. बकरी ईद प्रतीकात्मक साजरी करा असे म्हणत नाही. फक्त हिंदूंच्या सणाला विरोध करायचे एवढेच धोरण आहे. परंतु संजय राऊत, गणेशोत्सवाच्या नादी लागाल तर तुमचा पक्ष संपला तसे तुमचे उरलेसुरले अस्तित्वही संपल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी दिला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचे कुणीही समर्थन करत नाही, असे सांगून श्री. बन म्हणाले, वैचारिक लढाई विचाराने लढली पाहिजे. हाणामारी करू नये. परंतु हजारो बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते, रस्त्यावर रक्ताचे पाट वाहतात तेव्हा तुम्ही त्याबद्दल चकार शब्दाने बोलत नाहीत. रात्री बारा बारा वाजेपर्यंत जुलूस काढले जातात. सायलेन्सर काढून रस्त्यावर बाईकचे आवाज काढले जातात. लालबागमध्ये गणपतीआगमनाच्या वेळी दुष्कृत्य केले जाते त्याचा निषेध संजय राऊत यांनी केला का? त्यांचे तोंड शिवले होते का मूग गिळून गप्प बसले होते. लालबागमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्याची हिंमत संजय राऊत दाखवतील का ?
पाच ट्रिलियन म्हणजे पाचवर किती शून्य असतात हे सांगता येणार नाही असे जागतिक कीर्तीचे महान अर्थशास्त्रज्ञ संजय राऊत यांना भांडुपच्या गाढव नाक्यावर मटक्यावर आकडे लावून दिवसभर भांडुपचा गाढव नाका गाजवता येतो. आम्हाला अर्थशास्त्रातले काही कळत नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंचे तुम्ही चेले आहात. त्यामुळे अर्थशास्त्र, जीडीपीच्या गप्पा करू नका, असे श्री. बन यांनी सुनावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेल्या अन्नधान्यावर इथले 80 कोटी लोक जगतात, असे म्हणत देशवासियांचा, लाडक्या बहिणींचा अपमान करत असाल तर लक्षात ठेवा मागच्या निवडणुकीत याच लाडक्या बहिणींनी आणि जनतेने तुम्हाला घरी बसवले. जनतेचे आर्थिक ओझे कमी व्हावे, त्यांचे जीवन सुखकर व्हावे म्हणून अन्नधान्य दिले जाते. या देशाची अवस्था पाकिस्तान आणि बांगला देशसारखी व्हावी संजय राऊतांची इच्छा आहे. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही. 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा तेराव्या स्थानावर असलेली अर्थव्यवस्था चौथ्या स्थानावर आली आहे आणि लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर जाणार आहोत, असे श्री. बन यांनी सांगितले.
मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुमची हकालपट्टी करण्याची तयारी करताहेत हे तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही सांगताय की माझी गुप्तचर यंत्रणा खूप चांगली आहे. एवढेच काय तुमचे सरकार असताना तुमचे 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले ते तुम्हाला कळले नाही. तुम्ही प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता काटल्याने आता आदित्य ठाकरे तुमचा पत्ता कट करणार आहे हे तुमच्या पक्षातले तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही मोदीजींच्या गप्पा करताय, अशा शब्दात श्री. बन यांनी त्यांना फटकारले.













































































