गणेशोत्सवाला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल

मुंबई, दि. 30 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गणपती राज्य महोत्सव 2026’ अंतर्गत ‘Bappa .org गाथा गणेशकथांची’ या डिजिटल आर्काइव्हचे लोकार्पण करण्यात आले.

सार्वजनिक गणेशोत्सवातून निर्माण होणारे सामाजिक अभिसरण, समाजातील एकोपा, उत्साह आणि ऊर्जा यांची जगाला ओळख व्हावी, तसेच बाप्पाचा उत्सव जागतिक स्तरावर पोहोचून त्याला जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, या उद्देशाने ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (http://bappa.org) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

द एशियाटिक सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या घरातील गणपती उत्सवाची गाथा http://bappa.org यावर अपलोड करून या प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला. तसेच ‘बाप्पा रथ’ या राज्य सांस्कृतिक चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थी आणि शिल्पकारांनी साकारलेली 12 फूट उंचीची आकर्षक मोदकाची कलाकृती या चित्ररथाचे विशेष आकर्षण आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे 40 हजार गावांपर्यंत पोहोचून तेथील गणेशमूर्ती, गणेशोत्सवाच्या परंपरा आणि त्यांच्याशी जोडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कथा जगासमोर मांडण्यात येणार आहेत. देश-विदेशातील बाप्पाची विविध रूपे, गणेशभक्तांचे अनुभव तसेच काळानुरूप बदलत जाणाऱ्या गणेशभक्तीचे स्वरूप या डिजिटल मंचावर अनुभवता येणार आहे.

श्री गणेशाची भारतासह आशियातील अनेक देशांमध्ये आराधना केली जाते. जपानसारख्या देशातही श्री गणेशाची मंदिरे आहेत. बाल गणेशापासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत बाप्पाशी असलेले भावनिक नाते, विविध भागांतील श्रद्धा, परंपरा आणि उत्सवाचे सामाजिक स्वरूप व्यापक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न या मंचाच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मोदक’ विविध ठिकाणी नेण्यात येणार असून, त्याच्या प्रवासाच्या माध्यमातूनही बाप्पाशी संबंधित विविध कथा आणि सांस्कृतिक परंपरा पुढे आणल्या जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा