मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुष्काळसदृश परिस्थितीची केली पाहणी
लातूर, दि.२३: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊ, ता. निलंगा, जि. लातूर येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि झालेल्या नुकसानाची माहिती घेतली.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आपण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात आहोत. या वर्षीच्या दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम लातूर जिल्ह्यावर झाला आहे. कारण लातूर आणि धाराशिव हे दोन असे जिल्हे आहेत, जिथे अवघा ५०% पाऊस पडला आहे. मागील दुष्काळाचा विचार केला तर तेव्हा किमान ६५ ते ७०% पाऊस झाला होता, जो या वेळी ५०% वर आहे. त्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
येत्या दोन दिवसात आपण दुष्काळाचा GR काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत, अन्नधान्य आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

































































































