‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-३’चे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि ‘पुणे मेट्रो टप्पा-२’चे भूमिपूजन
देशातील मेट्रोचे जाळे 1200 किलोमीटरवर; 26 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू
पुणे दि. 4 : पुणे शहराच्या विकासाला आणि शहरातील वाहतुकीला पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे नवी गती मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील मोठ्या आयटी क्षेत्राला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच शहरातील जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क अधिक मजबूत होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-3’चे उद्घाटन आणि ‘पुणे मेट्रो टप्पा-2’च्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
पुणे हे आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा, स्टार्टअप, नवोपक्रम आणि उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून, मेट्रोच्या वाढत्या सुविधांमुळे शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे नमूद करून प्रधानमंत्री म्हणाले, देशात 2014 मध्ये केवळ 248 किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यरत होते. आज हे जाळे सुमारे 1200 किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, 26 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे. दररोज एक कोटीहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करीत आहेत. भारतीय मेट्रो नेटवर्क जगातील पहिल्या तीन मोठ्या मेट्रो नेटवर्कमध्ये गणले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात 2014 मध्ये केवळ 10 ते 11 किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू होता. आज सुमारे 200 किलोमीटर मेट्रो मार्ग सेवेत असून, 680 किलोमीटरहून अधिक मार्गांची कामे सुरू आहेत. राज्यात मेट्रो पायाभूत सुविधांवर अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली असल्याचे श्री. मोदी म्हणाले. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचतो, शहराची उत्पादकता वाढते आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते. पुणे मेट्रोचा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर उभारण्यात आला असून, सरकार आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांतून विकासाची नवी संधी निर्माण होत आहे. शहरांची स्पर्धात्मकता आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील शहरांना विकासाची केंद्रे बनविण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांच्या अर्बन चॅलेंज फंडला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून आगामी काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तसेच गेल्या 10 ते 12 वर्षांत 50 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर पडण्यास यश आल्याचा उल्लेख जागतिक बँकेच्या अहवालाच्या संदर्भाने त्यांनी केला. पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, वीज, पाणी आणि गॅस पाइपलाइनमधील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे प्रधानमंत्री मोदी म्हणाले. महाराष्ट्रातील प्रतिकूल हवामानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशीलतेने उभे असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, संकटाच्या काळात सरकार त्यांना मदत करेल. दिवाळीच्या सणात दुष्काळग्रस्त आणि संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबांचाही विचार करून त्यांच्या घरातही सणाचा आनंद निर्माण होण्यासाठी सर्वांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे मेट्रो मार्गिका-3 ची ठळक वैशिष्ट्ये
पुणे मेट्रो मार्गिका-3 (पुणेरी मेट्रो) ही माण-हिंजवडी ते शिवाजीनगर अशी 23.203 किलोमीटर लांबीची मार्गिका असून या मार्गावर एकूण 23 उन्नत स्थानके आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी-डीबीएफओटी) तत्त्वावर विकसित करण्यात आलेला हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 8 हजार 313 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देणारी ही ‘पिंक मेट्रो’ असून या मार्गावर 90 महिला चालक मेट्रो चालविणार आहेत. तसेच प्रकल्पाच्या एकूण मनुष्यबळापैकी 50 टक्के कर्मचारी महिला असणार आहेत. हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला शिवाजीनगरशी थेट जोडणाऱ्या या मेट्रोमुळे हजारो आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित व सुविधाजनक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.






















































































































































