अभिजीत दीपके यांच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला तरुणांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून आणि या नव्या पिढीशी संवाद साधण्यात काँग्रेस कुठेतरी मागे पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गूंज’च्या माध्यमातून Gen-Z शी थेट कनेक्ट होण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी कोटा, डेहराडून, प्रयागराज आणि पुणे अशा चार ठिकाणी कार्यक्रम झाले. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमांत शिक्षण, बेरोजगारी, विद्यार्थ्यांच्या समस्या, सामाजिक विषमता अशा अनेक विषयांवर सरकारवर आरोप केले आणि अनेक मोठमोठे दावेही केले. त्यात त्यांनी मनुस्मृतीवर टीका केली आणि नेमकी इथेच आपल्या पारंपरिक राजकारणाची गंमत झाली. भाजप आणि त्यांचे समर्थक राहुल गांधींच्या मनुस्मृतीवरील वक्तव्यात अडकले, तर दुसऱ्या बाजूला मनुस्मृतीवर टीका झाली म्हणून राहुल गांधींचे कौतुक करणारेही त्याच एका मुद्द्याभोवती फेर धरून नाचत राहिले. बाकीच्या भाषणात राहुल गांधी नेमके काय बोलले, त्यांनी दिलेले आकडे किती खरे आहेत, केलेल्या दाव्यांना आधार काय आहे—याकडे फारसे कुणाचे लक्षच गेले नाही.

पण इथेच Gen-Z ने वेगळी वाट पकडली. ‘झूठ की गूंज’ नावाची वेबसाइट समोर आली आणि तिने राहुल गांधींच्या चार कार्यक्रमांतील तब्बल 40 दावे एकत्र करून त्यांची 134 स्रोतांच्या आधारे तपासणी केल्याचा दावा केला. वेबसाइटच्या निष्कर्षानुसार त्यातील 29 दावे खोटे आणि 11 दिशाभूल करणारे आहेत. म्हणजे राहुल गांधींनी काय म्हटले यावर टाळ्या किंवा शिव्या देऊन थांबण्याऐवजी कुणीतरी त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले, एकेका दाव्याची नोंद केली, त्यामागचे आकडे शोधले, सरकारी आणि अन्य स्रोत तपासले आणि मग त्याचा व्यवस्थित दस्तऐवजच जनतेसमोर ठेवला. ‘तुम्ही खोटे बोलत आहात’ एवढे म्हणून सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा ‘हा तुमचा दावा आणि हा त्याविरुद्धचा पुरावा’ असे म्हणणे ही राजकीय चर्चेची कितीतरी प्रगल्भ पायरी आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा