पुणे येथे नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश…
तरुणांना पुढे करून माओवादी काँग्रेससाठी लढत आहेत
अनेक प्रयत्न करूनही भाजपा पराभूत होत नसल्याने विरोधकांनी आपली कार्यपद्धती बदलली आहे. माओवाद्यांचा हा नवा डाव कार्यकर्त्यांनी समजून घेतला पाहिजे.
काँग्रेससारख्या पक्षांना माहिती आहे, त्यांच्याकडे मोठे ओझे आहे. ते आपल्याशी लढू शकत नाहीत. कारण ज्या क्षणी ते आपल्याला प्रश्न विचारतात, एक बोट आपल्याकडे आणि चार बोटे त्यांच्याकडे येतात आणि त्यांनाही जनता प्रश्न विचारते, ‘तुम्ही काय केले ते सांगा.’ आणि मग मोदीजींच्या १२ वर्षांसमोर त्यांचा…५० वर्षांचा कारभार इतका खुजा दिसतो. त्यांच्या राज्यांमध्ये होणारे भष्टाचार, त्यांच्या राज्यांमध्ये होणारे पेपर लीक, या सगळ्या गोष्टींची उत्तरे त्या ठिकाणी त्यांना देता येत नाहीत. आणि म्हणून जसे लोकसभेपूर्वी एक त्यांनी नरेटिव्ह तयार केला होता, भारत जोडो लक्षात असेल. लोकसभेचा नरेटिव्ह काँग्रेसचा नव्हता. १८० संस्था होत्या, वेगवेगळ्या ‘एनजीओ’ होत्या. मी विधानसभेमध्ये पुराव्यासहित दाखवले. या १८० पैकी अनेक संस्था अशा होत्या की ज्या संस्थांना यूपीएच्या सरकारने अर्बन नक्षल म्हणून लोकसभेच्या पटलावर सांगितले होते. अशा १८० संस्था एकत्रित आणून भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध नरेटिव्ह त्यांनी तयार केला. कारण त्यांना माहिती आहे, अशा प्रकारच्या संस्थांना बॅगेज नसते, कारण त्यांना अकाउंटेबिलिटी नसते, कारण त्यांना निवडणूक लढायची नसते. त्यामुळे त्यांना विचारू शकत नाही, तुम्ही काय केले, तुम्ही काय करणार, हे त्यांना विचारता येत नाही. त्यांनी रोज खोटे बोलायचे, त्यांनी रोज आरोप करायचे, त्यांनी रोज रिकामा ग्लास दाखवायचा आणि आपण त्याची उत्तरे देत राहायची. अशा प्रकारचा हा नरेटिव्ह आहे.
युवा मोर्चाने तरुणांशी संवाद साधावा
माझे युवा मोर्चाला आवाहन आहे. आपल्या लक्षात असेल, २०२२ मध्ये आपण युवा वॉरियर अभियान सुरू केले होते. काही कारणांनी ते मागे पडले. पण आता आमचा जो युवा मोर्चा आहे, त्याला माझे सांगणे आहे. या महाराष्ट्रामध्ये १८ वर्षांपासून २६ वर्षापर्यंत या वयाचे युवा आणि युवती दोन कोटी आहेत. २ कोटी लोक १८ ते २६ या वयोगटात आहेत. त्यामुळे आता युवा मोर्चाला मी टास्क देतोय. आमच्याकडे हे जे दोन कोटी आमचे तरुण आहेत, यापैकी किमान १० लाख तरुण-तरुणी भारतीय जनता युवा मोर्चाच युवा वॉरियर्स असले पाहिजेत. आणि हे शक्य आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, समाजामध्ये खाली जा. समाजामध्ये राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असलेल्या युवांची संख्या जास्त आहे. तुम्ही बघा, जो राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहे, तो कमी बोलतो: पण त्याची संख्या कमी नाही आहे. त्या युवांपर्यंत पोहोचून त्यांना ज्यावेळी आपल्या संवादाचे माध्यम आपण बनवू, ज्यावेळी त्यांच्या माध्यमातून आपला संवाद सुरू होईल, त्यावेळी हा फेक नरेटिव्ह आपण पुन्हा एकदा तोडल्याशिवाय राहणार नाही. हा याकरता आवश्यक आहे की आपण बघितले, समाजमाध्यमेही अल्गोरिदमचे राजकारण करताहेत. समाजमाध्यमांमध्येही जिओ-पॉलिटिकल परिस्थितीचे प्रतिबिंय आपल्याला पाहायला मिळतेय. त्यामुळे लढाई केवळ चार माणसांची, दोन पक्षांशी नाही. या लढाईमध्ये अनेक अशा शक्ती आहेत की ज्यांना यांना असे वाटते, हस्ते-परहस्ते मोदीजींना कमजोर केले तरच हा देश कमजोर होऊ शकतो आणि म्हणून अनेक लोक त्याला हातभार लावताहेत.
दिमागी नक्षलींकडून युवा पिढीला भ्रमित करण्याचे प्रयत्न
विरोधकांची नवीन कार्यपद्धती माहिती करून घ्या. आमच्या युवांना संविधानाचे नाव घेऊन संविधानाच्या विरोधात उभे करायचे, असा खेळ सुरु आहे. यांचे मनसुवे समजून घ्या. संविधानाने तयार केलेली प्रत्येक संस्था खराब आहे म्हणून सांगायची. पहिल्यांदा सांगायचे, संविधानाने तयार केलेले इलेक्शन कमिशन खराब आहे, न्यायव्यवस्था खराब आहे, रिझर्व्ह बँक खराब आहे, सीएजी खराय आहे. ही सुरुवात आहे. एक दिवस हे लोक सांगणार, बघा, या संविधानाने तयार केलेल्या या सगळ्या संस्था कुचकामी आहेत. याचाच अर्थ हे संविधान आपल्याला न्याय देऊ शकणार नाही आणि म्हणून आता नवीन व्यवस्था आपल्याला केली पाहिजे, अशा पद्धतीने हे लोक फेक नरेटिव्हच्या माध्यमातून संविधानविरोधी ताकद उभी करताहेत. तुम्ही बघा, दोन दिवसांत यांच्याबद्दल जे बोललो तेवढीच रील कापतील आणि त्या ठिकाणी आणतील, संविधान कुचकामी आहे, अशा प्रकारची नालायक प्रवृत्ती यांची आहे. पण लक्षात ठेवा, यांनी कितीही या संविधानाने तयार केलेल्या संस्थांच्या विरुद्ध एल्गार पुकारला तरीही तुमची शक्ती जिंकू शकत नाही. अरे, तुम्ही जिथे बंदुका घेऊन होतात, तिथे तुम्हाला आम्ही पराभूत केले आहे. आता तुम्ही या दुसऱ्या लढाईमध्ये आहात, ज्या लढाईला मोदीजींनी दिमागी नक्षल म्हटलेले आहे. हे दिमागी नक्षल आमच्या युवा पिढीला ग्रासित करण्याचा प्रयत्न करतायत. पण आपणदेखील राष्ट्रवाद हातामध्ये घेऊन आणि युवाशक्तीच्या कल्याणाकरता मैदानात उतरलो तर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. मित्रांनो, लढाई मोठी आहे. पण लढाई किती मोठी असली तरी शिवरायांनी शिकवलेय, देव, देश आणि धर्माकरता लढाईमध्ये उतरलात तर विजय आपलाच आहे.












