केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांची घणाघाती टीका
▪️काँग्रेस कार्यसमितीने ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनाऐवजी केवळ दोन कडवी गाण्याचा घेतलेला निर्णय केवळ देशविरोधीच नाही, तर यामुळे संसदेने केलेल्या कायद्याची उघड अवहेलनाही केली आहे.
▪️१९३७ मध्ये तुष्टीकरणासाठी काँग्रेसनेच ‘वंदे मातरम्’ या गीताचे दोन तुकडे केले. तिथूनच द्विराष्ट्र सिद्धांताला बळ मिळाले आणि देशाची फाळणी झाली.
▪️‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त मोदी सरकारने ही ऐतिहासिक चूक सुधारत संपूर्ण गायनाला कायदेशीर स्वरूप दिले आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा त्याच मतपेढीसाठी तुष्टीकरणाच्या मार्गावर आहे.
▪️मी देशातील जनतेला आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाविरोधात आवाज उठवावा.
मुंबई, दि. 21 : काँग्रेस कार्य समितीने ‘वंदे मातरम्’ची फक्त पहिली दोन कडवीच गाण्याचा निर्णय घेऊन पुन्हा एकदा तुष्टीकरणाच्या राजकारणाची पुनरावृत्ती केली असल्याची घणाघाती टीका माननीय केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री. अमित शाह यांनी काँग्रेसवर केली आहे. १९३७ मध्ये काँग्रेसने घेतलेला हाच निर्णय देशाच्या फाळणीचा पाया ठरला होता. ‘वंदे मातरम्’ च्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे संपूर्ण गीत गायले जाईल, असा निर्णय घेऊन ही ऐतिहासिक चूक सुधारली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी काँग्रेसच्या या निर्णयाला तुष्टीकरणाचे राजकारण तसेच बंकीमचंद्र चटोपाध्याय आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान असल्याचे सांगत श्री. शाह यांनी देशवासियांना याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
श्री. शाह म्हणाले, काँग्रेस कार्यसमितीने काल एक धक्कादायक आणि राष्ट्रविरोधी निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने १९३७ मध्ये त्यांच्याच पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे अनुसरण करत महान गीत ‘वंदे मातरम्’ची फक्त दोनच कडवी गाण्याचा निर्णय घेतला आहे. श्री. शाह म्हणाले की, संपूर्ण देशाने हे लक्षात ठेवले पाहिजे की १९३७ मध्ये काँग्रेस पक्षाने मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी ‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले होते आणि देशाच्या फाळणीची पायाभरणी केली होती. येथूनच द्वि-राष्ट्र सिद्धांताला बळ मिळाले, ज्याने शेवटी देशाची फाळणी आणि पाकिस्तानच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला.
श्री. शाह म्हणाले की, आज ‘वंदे मातरम्’च्या रचनेच्या १५० व्या वर्षी मोदी सरकारने बंकीम बाबूंच्या या अमर रचनेचे पूर्ण गायन करून राष्ट्रीय एकता पुन्हा मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती ऐतिहासिक चूक सुधारली आहे. सरकारने असाही निर्णय घेतला आहे की सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे संपूर्ण गीत गायले जाईल आणि या निर्णयाला कायदेशीर मान्यताही देण्यात आली आहे, तर काँग्रेसने काल या निर्णयाचा अवमान करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसचा हा निर्णय त्यांच्या उघड तुष्टीकरणाच्या राजकारणाला दुजोरा देणारा असल्याचे सांगून श्री. शाह म्हणाले की, आपल्या व्होट बँकेला खूश करण्यासाठी काँग्रेसने केवळ स्व. बंकिम बाबूंच्या अमर रचनेचाच अपमान केला नाही, तर ज्या लाखो हुतात्म्यांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिले आणि वर्षे न् वर्षे तुरुंगात यातना सहन केल्या, त्या सर्वांचा अपमान केला आहे. काँग्रेस पक्ष आज संसदेने बनवलेला कायदा फेटाळून लावून स्वतःच्याच १९३७ च्या पक्षीय प्रस्तावाचे अनुकरण करत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा देशात तुष्टीकरणाचे राजकारण पूर्ण ताकदीने पुढे नेत आहे, ही अत्यंत आश्चर्याची बाब आहे. त्यांनी देशवासीयांना आवाहन केले की, देशाने एकदा ‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे करण्याची चूक केली होती आणि त्या चुकीचा गंभीर परिणाम देशाला भोगावा लागला होता, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
श्री. शाह म्हणाले की, आता देशवासीयांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि देशात आता तुष्टीकरणाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, हे दाखवून दिले पाहिजे. ते म्हणाले की, हा एक स्वतंत्र देश आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतर, १९३७ मध्ये काँग्रेसने घेतलेला निर्णय सुधारण्याचे काम केले आहे. देशातील जनता आता या सुधारणेला होणारा विरोध सहन करणार नाही. भारतीय जनता पक्ष काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करतो आणि जनतेच्या दरबारात तसेच विधिमंडळातही याचा जोरदार विरोध करेल.



























