पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पेस स्टार्टअप्सच्या सीईओंसोबत संवाद
नवी दिल्ली, दि. 24 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अवकाश स्टार्टअप्सची प्रशंसा केली आहे. वीस स्पेस स्टार्टअप्सच्या सीईओ आणि संस्थापकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भारतात प्रतिभेची कोणतीही कमतरता नाही आणि देशाने अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. स्टार्टअप्सच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट केले की, तुम्ही बिनधास्त जोखीम पत्करा, सरकार संपूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे आहे.
या संभाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनी देशात असे पोषक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले, जे जगभरातील प्रतिभेला आपल्याकडे आकर्षित करेल. स्टार्टअप्सच्या सीईओ आणि संस्थापकांशी चर्चा करताना त्यांनी योग्य धोरणांवर भर दिला आणि सांगितले की, चांगली धोरणे ही नेहमी जोखीम पत्करणाऱ्या उद्योजकांना आत्मविश्वास देतात.
चर्चेत सहभागी झालेले स्टार्ट अप्स
या संवादादरम्यान वीस प्रमुख स्टार्टअप्सचे सीईओ आणि संस्थापक सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने स्कायरूट एरोस्पेस, अग्निकुल कॉसमॉस, पिक्सेल, ध्रुव स्पेस, गॅलेक्सीआय, पियरसाइट, बेलाट्रिक्स एरोस्पेस, दिगंतरा, सॅटश्योर, सुहोरा टेक्नॉलॉजीज, मनस्तु स्पेस, अॅस्ट्रोबेस, टेकमीर स्पेस, व्योमिक, कॉस्मोसर्व्ह स्पैस, ऑर्बिटएड एरोस्पेस, स्कायसर्व्ह (हायस्पेस), सेरेंडिपिटी स्पेस, व्हॅसर लॅब्स, मिस्टईओ या कंपन्यांचा समावेश होता.
‘भारतात प्रतिभेची कमतरता नाही’
पंतप्रधान पुढे म्हणाले की, आपण अशी व्यवस्था आणि वातावरण निर्माण केले पाहिजे की, जेव्हा जग अंतराळ क्षेत्राबद्दल विचार करेल, तेव्हा भारताकडेच सर्वप्रथम पाहिले जावे. आपण एखाद्या भारतीय स्टार्टअप किंवा भारतीय अंतराळ संस्थेशी संपर्क साधला पाहिजे. आपण या सर्व प्रतिभावंतांना चुंबकाप्रमाणे आकर्षित करू शकतो आणि हीच आपली सर्वात मोठी ताकद ठरू शकेल. आपण खूप किफायतशीर आहोत आणि आपल्याकडील प्रतिभावंतांच्या गुणवत्तेबद्दल कोणतीही शंका नाही. आपल्या लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या जोखीम पत्करण्याची क्षमता आहे, त्यामुळे आपण या क्षेत्रात आपले अद्वितीय स्थान वेंगाने प्रस्थापित करू शकतो. त्यांनी अटल टिंकरिंग लॅब्ससोबत मिळून काम करण्यावरही भर दिला, ज्यामुळे लहान मुलांमध्ये लहानपणापासूनच अंतराळाबद्दल कुतूहल आणि आवड निर्माण होऊ शकेल.
“आपण वारंवार निर्णय बदलत नाही”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुम्ही एका नवीन क्षेत्रात धाडस दाखवले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सरकारवर विश्वास ठेवला आहे. माझा नेहमीच असा विश्वास आहे की आपण जो काही निर्णय घेऊ, त्यावर आपण ठाम राहिले पाहिजे. आपण वारंवार निर्णय बदलू नयेत. यामुळे जे लोक जोखीम पत्करण्यास तयार आहेत, त्यांना सुरक्षिततेची भावना मिळते. त्यांच्या प्रयत्नांमध्ये काही चुकीचे घडले, तर ती वेगळी बाब आहे, पण कोणीही त्यांना वाऱ्यावर सोडून देणार नाही, हा विश्वास आपण टिकवून ठेवला पाहिजे. मला पूर्ण खात्री आहे की भारत अवकाश क्षेत्रात जगभरातील प्रतिभेला नक्कीच आकर्षित करू शकेल.”



























