• August 24, 2026
  • टीम मनोगत भाजपा
  • 0

राष्ट्रीय सरचिटणीस खा . विनोद तावडे यांची माहिती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकपदाच्या कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण

नवी दिल्ली, दि. 24 : पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांच्या ७६ व्य वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या राज्यकर्ता पदावरील कारकीर्दीला  २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीतर्फे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे . भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. विनोद तावडे यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

या अभियानात भाजपचे कार्यकर्ते देशभरातील १४ लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचून ‘मातृ संवाद’ कार्यक्रम आयोजित करतील आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मान करतील.

‘सेवा सेतू अभियाना’अंतर्गत १५ दिवस ब्लॉक स्तरावर शिबिरांचे आयोजन; आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसारख्या योजनांपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना सरकारी कल्याणकारी योजनांशी जोडण्यात येणार आहे. ‘सेवेत माझे योगदान’ आणि ‘राष्ट्रीय नवोन्मेष आव्हान’च्या माध्यमातून युवकांना सेवा, सर्जनशीलता आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार.

राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या बैठकीची तसेच ‘सेवा संकल्प अभियाना’संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेची महत्त्वपूर्ण माहिती देताना श्री . तावडे म्हणाले की, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील सेवाभाव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध सेवाकार्ये, लाभार्थ्यांना सरकारी योजनांशी जोडणारे कार्यक्रम तसेच युवकांना सेवा आणि नवोन्मेषाशी जोडणारे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

श्री. तावडे यांनी सांगितले की, भाजपच्या नव्या टीमच्या गठनानंतर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक झाली. त्यानंतर ‘सेवा संकल्प अभियाना’साठी सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, संघटन सरचिटणीस तसेच प्रत्येक राज्यातून निवडण्यात आलेल्या सात ते आठ कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हे अभियान देशभर प्रभावीपणे राबवून ते बूथ स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे.

दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून देशभर ‘सेवा पंधरवडा’ आयोजित केला जातो. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे व्यक्तिमत्त्व सेवाभावाशी सदैव जोडलेले राहिले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून विविध सेवाकार्ये आयोजित केली जात आहेत. यंदाचे वर्ष विशेष आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि येत्या ७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या सार्वजनिक जीवनातील या महत्त्वपूर्ण टप्प्याला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देशभर महिनाभराचे ‘सेवा संकल्प अभियान’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘सेवा संकल्प अभियाना’दरम्यान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचा सेवाभाव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. या अभियानांतर्गत अंगणवाड्यांमध्ये कार्यरत माता-भगिनींचा सन्मान करण्यात येणार असून, त्यांच्यासोबत ‘मातृ संवाद’ कार्यक्रम आयोजित केले जातील. देशभरातील १४ लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रांपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचतील आणि सेवाभावाने कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सन्मान करतील.

श्री. विनोद तावडे यांनी सांगितले की, ‘सेवेत माझे योगदान’ या नावाने एक महत्त्वपूर्ण उपक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून विशेषतः युवक आणि नागरिकांना अभियानादरम्यान करण्यात येणाऱ्या सेवाकार्यांचे व्हिडिओ किंवा रील्स तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

 

‘सेवा सेतू अभियाना’च्या माध्यमातून  पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यास पात्र असलेली कोणतीही व्यक्ती केवळ योजनेतून वगळली गेल्यामुळे लाभापासून वंचित राहू नये, याची खात्री केली जाणार आहे. यासाठी संबंधित विभागांकडून ब्लॉक स्तरावर १५ दिवस शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. आयुष्मान भारत किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसारख्या योजनांमध्ये एखाद्या पात्र व्यक्तीचे नाव राहून गेले असल्यास, त्या व्यक्तीला या शिबिरांमध्ये जाऊन आवश्यक अर्ज भरता येईल आणि संबंधित योजनेत नोंदणी करता येईल. अशा प्रकारे ‘सेवा सेतू अभियान’ हे सरकारच्या योजना आणि त्यांचे प्रत्यक्ष लाभार्थी यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून काम करेल.

श्री. विनोद तावडे यांनी सांगितले की, युवकांच्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाच्या क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘राष्ट्रीय नवोन्मेष आव्हान’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत युवकांना त्यांच्या स्थानिक भागातील समस्यांची जाणीव करून दिली जाईल आणि संशोधन व नवोन्मेषाच्या माध्यमातून त्यावर उपाय सुचविण्याची संधी दिली जाईल. ही स्पर्धा ब्लॉक, जिल्हा आणि राज्य स्तरावर आयोजित केली जाणार असून, त्यातून स्थानिक समस्यांवर स्थानिक पातळीवरच सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण उपाय समोर येण्यास मदत होईल.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा