भाजपाचा ‘वंदे मातरम्’च्या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाचा ठराव मंजूर
नवी दिल्ली , दि. 23 : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नबीनजी यांच्या नेतृत्वात आज ‘वंदे मातरम्’च्या सन्मान, प्रतिष्ठा आणि ऐतिहासिक वारशाच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाचा सन्मान निरंतर जपण्याचा भाजपाचा निर्धार या ठरावातून अधोरेखित झाला आहे.
१९ ऑगस्ट २०२६ रोजी काँग्रेस कार्यसमितीने १९३७ मधील आपला ठराव पुन्हा अधोरेखित करून, काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन केवळ पहिल्या दोन कडव्यांपुरते मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा भारतीय जनता पक्ष तीव्र शब्दांत निषेध करतो आणि त्याला ठामपणे विरोध करतो.
भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रगीत आहे. ते भारतमातेप्रती असलेल्या श्रद्धेचे आणि आदराचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यलढ्यात ते एक प्रेरणादायी मंत्र ठरले आणि भारताच्या राष्ट्रीय चेतनेचे ते एक अमर प्रतीक आहे.
भारतीय जनता पक्ष असा ठराव करीत आहे की:
१. 19 ऑगस्ट 2026 रोजी काँग्रेस कार्यसमितीने आपल्या 1937 च्या ठरावाची पुनःपुष्टी करून काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भारतीय जनता पक्ष तीव्र शब्दांत निषेध करतो आणि त्याला स्पष्टपणे विरोध करतो.
२. भारताचे राष्ट्रगीत म्हणून संपूर्ण ‘वंदे मातरम्’चा सन्मान, गौरव, वारसा आणि राष्ट्रीय दर्जा अबाधित राखण्याचा भारतीय जनता पक्ष ठामपणे संकल्प करतो. भारताच्या राष्ट्रीय चेतनेचे आणि स्वातंत्र्यलढ्याचे अमर प्रतीक म्हणून ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण स्वरूप जपले गेले पाहिजे.
३. घटनासभेच्या 1950 मधील घोषणेद्वारे निश्चित झालेला आणि 2026 मध्ये संसदेने केलेल्या घटनात्मक/कायदेशीर सुधारणेद्वारे अधिक बळकट झालेला ‘वंदे मातरम्’चा घटनात्मक व वैधानिक दर्जा आम्ही अधोरेखित करतो. या 2026 मधील दुरुस्तीने राष्ट्रगीताला दिल्या जाणाऱ्या वैधानिक संरक्षणाच्या धर्तीवर राष्ट्रगीतासमकक्ष संरक्षण ‘वंदे मातरम्’ला प्रदान केले आहे.
४. राष्ट्रगीताला जातीय/सांप्रदायिक दबाव, राजकीय तुष्टीकरण किंवा संकुचित मतपेढीच्या राजकारणापुढे झुकवण्याचा प्रत्येक प्रयत्न ठामपणे नाकारणे.
५. काँग्रेसला हे स्मरण करून देणे की, तिच्या कार्यसमितीचा ठराव हा भारतीय प्रजासत्ताकाच्या घटनात्मक संस्थांवर किंवा कायद्यांवर मात करू शकत नाही. तसेच, १९३७ मधील राजकीय तडजोडीला १९५० मधील घटनात्मक व्यवस्थेपेक्षा किंवा २०२६ मध्ये संसदेनं केलेल्या कायद्यापेक्षा वरचं स्थान देता येणार नाही.
६. वंदे मातरम्च्या काही भागांचे संक्षिप्तीकरण ज्या ऐतिहासिक आणि राजकीय परिस्थितीत झाले, ती पार्श्वभूमी जनतेसमोर मांडणे. त्यामध्ये मुस्लिम लीगने घेतलेले आक्षेप तसेच त्यानंतरच्या सांप्रदायिक आणि फुटीरतावादी मागण्यांच्या राजकारणाचाही समावेश करणे.
७. महात्मा गांधींच्या स्वतःच्या साक्षीचे स्मरण करून देणे आणि ती व्यापक प्रमाणावर प्रसारित करणे—त्यांनी वंदे मातरम् हे “साम्राज्यवादविरोधी आरोळी” बनले असल्याचे सांगितले होते आणि त्याचा संबंध “शुद्ध राष्ट्रीय भावनेशी” जोडला होता. यावरून, काही कडव्यांच्या साहित्यिक किंवा धार्मिक संदर्भांपलीकडे वंदे मातरम्चे व्यापक राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित होते.
८. भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत ‘वंदे मातरम्’चा इतिहास, अर्थ, राष्ट्रीय महत्त्व आणि गौरवशाली वारसा पोहोचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देशव्यापी अभियान राबविणे.
९. विशेषतः युवा पिढीला शिक्षित व जागृत करून राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण सहा कडव्यांचा आणि त्यामागील इतिहासाचा विसर पडू नये, तसेच भावी पिढ्यांना ‘वंदे मातरम्’शी अविभाज्यपणे जोडलेले देशभक्तीचे जागरण, स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष आणि असंख्य देशभक्तांचे बलिदान यांची जाणीव व्हावी, यासाठी प्रयत्न करणे.
१०. राजकीय सोय किंवा तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी ‘वंदे मातरम्’च्या सन्मानाशी आणि गौरवशाली वारशाशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, ही ठाम भूमिका अधोरेखित करणे.
हा केवळ एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित विषय नाही. हा भारताच्या सन्मानाचा आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य देशभक्तांच्या अमूल्य वारशाचा विषय आहे.
भाजप प्रत्येक नागरिकाला आवाहन करते की, ‘वंदे मातरम्’ हे शब्द एकेकाळी इतके सामर्थ्यशाली होते की त्यांनी एका साम्राज्यालाही हादरवून सोडले होते, हे आपण स्मरणात ठेवावे. ब्रिटिशांनी या घोषणेवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, कारण ‘वंदे मातरम्’ ने जनमानसात प्रतिकाराची ज्वाला चेतवली होती. स्वातंत्र्य, त्याग आणि राष्ट्राभिमानाचा मंत्र म्हणून पिढ्यान्पिढ्या भारतीयांनी ‘वंदे मातरम्’ चा जयघोष आपल्या हृदयात जपला.
या गौरवशाली वारशाला आजच्या ‘व्होट-बँक’च्या राजकारणाच्या गणितापुरते मर्यादित करता येणार नाही.
१९४७ मध्ये स्वातंत्र्याचा हुंकार म्हणून दुमदुमलेले तेच ‘वंदे मातरम्’, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेखाली विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी राष्ट्राचा सर्वोच्च जयघोष म्हणून पुन्हा निनादत राहील.



























