गृहमंत्री अमित शाहांनी दाखवला हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वेचे रूप बदलले – अमित शाह
अहमदाबाद, दि. 28: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी २७ रोजी गुजरातच्या साबरमती स्थानकावरून देशातील पहिल्या एलएनजी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आयोजित सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील रेल्वेचे संपूर्ण रूप बदलले असल्याचा दावा केला. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात घोटाळ्यांशिवाय काहीच केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमित शाह यांनी १५०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये देशातील पहिली एलएनजी रेल्वे सुरू करणे, रेल्वेमार्ग दुपदरीकरण, ‘कवच’ ट्रेन सुरक्षा यंत्रणा, स्वयंचलित सिग्नल प्रणाली आणि लोकोमोटिव्ह मेंटेनन्स शेड या प्रकल्पांचा समावेश आहे. २०१५-१६ मध्ये रेल्वेला २९३ कोटी लिटर डिझेल वापरले होते. २०२४-२५ मध्ये हा आकडा कमी होऊन १०८ कोटी लिटरवर आला आहे. २०३० पर्यंत डिझेलमुक्त रेल्वेचा आमचा संकल्प आहे. हायड्रोजन रेल्वे, एलएनजी रेल्वे याच संकल्पपूर्तीसाठीची पावले आहेत, असे शाह यांनी सांगितले. यावेळी मोदी सरकारच्या कार्यकाळातील प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. काहीही निरर्थक बडबड करणाऱ्या काँग्रेसला जनतेने आकडेवारी आणि तथ्यांच्या आधारे चर्चेचे आव्हान दिले पाहिजे.
काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात घोटाळ्यांशिवाय काहीही केले नाही, तर दुसरीकडे गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान मोदींवर ‘चार आण्यांच्या’ भ्रष्टाचाराचाही आरोप कोणी करू शकलेले नाही. २०१४ पूर्वी या देशावर एकाच कुटुंबाचे राज्य होते. मात्र मोदी सरकार आल्यानंतर समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर, रॅपिड रेल सिस्टीम आणि प्रीमियम स्टेशन्स यांसारख्या आधुनिक सुविधा सुरू झाल्या. हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करून मोदींनी भारताला जगातील मोजक्या चार देशांच्या पंक्तीत आणून बसवले आहे, असे शाह म्हणाले. मुंबई ते वडोदरा दरम्यानच्या पहिल्या लाँग डबल स्टॅक कंटेनर ट्रेनची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की, यामुळे मालवाहतुकीसाठी लागणाऱ्या ट्रॅकची कमतरता दूर होईल आणि २०४० पर्यंतच्या गरजा पूर्ण होतील. ९७टक्के रेल्वेत बायो-टॉयलेट्स बसवण्यात आले आहेत. ८७ टक्के एलएचबी डब्यांची देशातच निर्मिती झाली आहे. सध्या भारताने ९९.६ टक्के विद्युतीकरण पूर्ण केले असून, चीन (९२%), स्पेन (६८%), फ्रान्स (६०%) आणि ब्रिटन (४९%) यांच्या तुलनेत भारत लवकरच १०० टक्के विद्युतीकरणाचा टप्पा गाठेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
अशी आहे एलएनजी रेल्वे
हे रेल्वे इंजिन लिक्विफाईड नॅचरल गॅस (एलएनजी) अर्थात द्रवीकृत नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून वापर करते. एलएनजीसोबत डिझेलचा वापर करण्याचा पर्यायदेखील या इंजिनमध्ये आहे. या इंजिनात २२०० लिटर एलएनजी मावेल एवढी टाकी आहे. एकदा टाकी पूर्ण भरल्यानंतर त्यावर सुमारे २२० किमीपर्यंत ही ट्रेन धावू शकते. एलएनजीमुळे डिझेलचा वापर ४० टक्क्यांनी कमी होईल, असा दावा करण्यात येत आहे. १४०० हॉर्स पॉवरच्या इंजिनात आवश्यक ते बदल करून ते एलएनजीवर चालण्यास सक्षम बनवण्यात आले आहे.





























