मजबूत व सशक्त भारतासाठी ज्यांनी एकात्म मानववाद आणि अंत्योदय नावाची विचारधारा दिली, असे थोर विचारवंत स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
बालपणीच आई-वडील व धाकट्या भावाचा मृत्यू झाल्याने दीनदयाळजींचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. त्यांचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला. प्रचंड बौद्धिक क्षमता असूनही त्यांनी मोठ्या शासकीय अधिकार पदांची संधी नाकारली आणि स्वतःला संपूर्णपणे राष्ट्रकार्यात समर्पित केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित प्रचारक होते. ते कट्टर हिंदुत्ववादी होते आणि त्यांची संघनिष्ठा अंतिम श्वासापर्यंत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच माझे घर आहे, असे ते अभिमानाने म्हणत असत. भारताला वैभव प्राप्त करून देणारे त्यांचे एकात्म मानवदर्शन हे विकसित भारत घडविण्यासाठी आजही दिशा देणारे आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी राष्ट्रासाठी अतुल्य योगदान दिले आहे. त्यांचे विचार केवळ एका राजकीय पक्षापुरते सीमित नसून संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मंत्र होते. बौद्धिक एकता, सृजनात्मकता आणि सहकार हाच विकासाचा मार्ग आहे, संघर्ष किंवा संहार नाही, असे त्यांचे ठाम मत होते. त्यांचा एकात्म मानववाद आजही भारतीय विचारधारेसाठी मार्गदर्शक आहे. त्यामुळेच भारतीय राजकारणावर त्यांनी केलेला प्रभाव प्रकर्षाने जाणवत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना राजकीय पातळीवर नेण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली.
एकात्म मानववादाची संकल्पना
पंडितजींची राजकीय विचारधारा एकात्म मानववाद म्हणून ओळखली जाते. १९६५ मध्ये मुंबईत झालेल्या एका चिंतन बैठकीत त्यांनी ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते भारतीय समाज हा केवळ पाश्चात्य भांडवलशाही व साम्यवादावर आधारित असू शकत नाही. त्याला भारतीय संस्कृतीशी सुसंगत असलेले स्वतःचे एक वैचारिक तत्वज्ञान आवश्यक आहे. या विचारधारेत त्यांनी मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा चारही गरजांची पूर्तता करणाऱ्या व्यवस्थेची कल्पना मांडली. यामध्ये स्थानिक विकास, स्वावलंबन, स्वदेशी आणि भारतीय परंपरेनुसार समाज व्यवस्थेवर भर देण्यात आला. समाजातील शेवटच्या घटकाचा उदय म्हणजेच अंत्योदय, हे त्यांच्या विचारांचे अंतिम ध्येय होते.
संघटन कौशल्य आणि जनसंघाचे अध्यक्षपद
दीनदयाळजींना १९३७ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची ओळख झाली आणि त्यांनी संघाच्या विचारसरणीचा स्वीकार केला. संघ प्रचारक म्हणून त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. १९५१ मध्ये स्व. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली, तेव्हा पंडित दीनदयाळजींना जनसंघाचे पहिले सरचिटणीस बनविण्यात आले. त्यांनी संघटनात्मक बांधणीला बळकटी दिली आणि जनसंघाला भारतीय राजकारणात एक मजबूत पक्ष म्हणून उभे केले. त्यांच्या याच अतुलनीय संघटन कौशल्याची आणि निस्वार्थ सेवेची दखल घेऊन डिसेंबर १९६७ मध्ये कालीकत येथे झालेल्या अधिवेशनात त्यांची भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाला नवी दिशा दिली. दिनांक ११ फेब्रुवारी १९६८ रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. मुघलसराय रेल्वे स्टेशनच्या रुळाजवळ त्यांचे पार्थिव आढळले. आज या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन करण्यात आले आहे. त्यांचे विचार आजही आपल्याला राष्ट्र प्रथम या भावनेने कार्य करण्याची प्रेरणा देतात.
स्व. दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
प्रदीप पाटील
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य
















