नवी दिल्लीत मोदी – पुतीन शिखर भेट, सागरी सुरक्षेपासून अणुसहकार्यापर्यंत व्यापक चर्चा
नवी दिल्ली, दि. 12 : २०३० पर्यंत भारत आणि रशियातील व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्लीत आयोजित १८ व्या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठकीत ठरवण्यात आले. केवळ दोन आठवड्यांच्या कालावधीत दोन्ही नेत्यांची ही दूसरी भेट ठरली. या बैठकीत सागरी सुरक्षा, दुर्मीळ खनिजे, औद्योगिक भागीदारी आणि नागरी अणुऊर्जा सहकार्यासह विविध धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संघर्षांवर चिंता व्यक्त्त करताना पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की, कोणत्याही समस्येचे निराकरण केवळ संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीतूनच शक्य आहे. शांतता प्रक्रियेत सक्रिय योगदान देण्यासाठी भारत सदैव सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यापूर्वी बिश्केक येथे झालेल्या एससीओ परिषदेतही मोदींनी युद्धाचा अंत करण्याचे आवाहन केले होते. बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी पुतीन यांना तमिळ संत तिरुवल्लुवर यांच्या ‘तिरुक्कुरल’ या जगप्रसिद्ध महाकाव्याची रशियन अनुवादित आवृत्ती भेट दिली.
सागरी व्यापार व खलाशांची सुरक्षा
पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारावर गंभीर परिणाम झाला आहे. या भागात भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दोन्ही नेत्यांनी सागरी सुरक्षिततेचा प्राधान्याने आढावा घेतला. व्यावसायिक जहाजांची सुरक्षा आणि पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी एकत्रित काम करण्यावर यावेळी भर देण्यात आला. राजकीय, संरक्षण, अवकाश आणि आर्थिक क्षेत्रांतील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा पुनरुच्चार दोन्ही बाजूंनी केला.
औद्योगिक अन् नागरी अणुसहकार्य
नागरी अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणखी विस्तारताना विद्यमान अणुभट्ट्यांचे व्यवस्थापन आणि नवीन प्रकल्पाच्या जागेसंदर्भात चर्चा सकारात्मक दिशेने पुढे गेली. नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘इनोप्रॉम इंडिया’ या पहिल्या औद्योगिक प्रदर्शनाला दोन्ही नेत्यांनी भेट दिली आणि उद्योजकांशी संवाद साधला. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी २४ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना रशिया भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले असून भारताने ते स्वीकारले आहे.
२०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य
भारत आणि रशियाने २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या रशियाकडून ऊर्जा आयातीत मोठी वाढ झाल्याने व्यापारी तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी भारताकडून होणाऱ्या निर्यातीला चालना देण्यावर सहमती झाली. ऊर्जा आणि संरक्षणापलीकडे जाऊन रेल्वे, बोगदा निर्मिती आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये रशियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विचार सुरू आहे. याशिवाय हरित तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण खनिजांचे उत्खनन, प्रक्रिया आणि पुनर्वापरावरही दोन्ही देशांचे लक्ष केंद्रित आहे.
१०० अब्ज डॉलर्सचे व्यापार उद्दिष्ट; आर्थिक महत्त्व अन् आव्हाने
भारत आणि रशियादरम्यान निर्धारित करण्यात आलेले १०० अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना एका नव्या टप्प्यावर नेणारे आहे.
१) व्यापारी समतोल साधण्याचा प्रयत्न : रशियाकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या स्वस्त कच्च्या तेलाच्या आयातीमुळे भारताची रशिदक्ष सोबतची व्यापार तूट लक्षणीय वाढली आहे. हे उद्दिष्ट गाठताना भारताकडून रशियाला होणाऱ्या औषधनिर्माण, कृषी उत्पादने, यंत्रसामग्री आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीला थेट चालना दिली जाणार आहे.
२) पारंपरिक क्षेत्रांपलीकडे विस्तार : तेल आणि संरक्षण सामग्रीच्या पलीकडे जाऊन स्टील व्हॅल्यू चेन, रेल्वे पायाभूत सुविधा, बोगदे निर्मिती आणि प्रगत उत्पादनांमध्ये रशियन तंत्रज्ञान आणि भारतीय कुशल मनुष्यबळाची सांगड घातली जात आहे.
३) दुर्मीळ खनिजे : बॅटरी तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने आणि स्वच्छ ऊर्जेसाठी लागणाऱ्या दुर्मीळ खनिजांचे उत्खनन व प्रक्रिया यामध्ये भागीदारी विकसित करून पुरवठा साखळी सुरक्षित करण्याचे दोन्ही देशांचे धोरण आहे.



























