मुंबई, दि. 11 : कोकणवासीय गणेशभक्तांना गणेशोत्सव आपल्या गावी कुटुंबीयांसोबत आनंदाने व उत्साहात साजरा करता यावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांच्या कोकण प्रवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आज शुक्रवार, दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली. दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल्वेला मार्गस्थ केले. यावेळी गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात उत्साहात निरोप दिला.
गणेशोत्सव आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने साजरा करता यावा, यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमाचे १४वे वर्ष असून, गेल्या १४ वर्षांपासून गणेशभक्तांसाठी स्वखर्चाने ही विशेष प्रवास व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले.
दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ १३ सप्टेंबर, रविवारी!
पहिल्या ‘मोदी एक्सप्रेस’ला चाकरमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे निघालेल्या प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. बाप्पाच्या आगमनाची ओढ आणि कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. दरम्यान, या उपक्रमातील दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ रविवार, १३ सप्टेंबर रोजी कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे. दरवर्षी चाकरमान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.



































