आ. संजय केळकर यांच्या प्रयत्नांना यश
ठाणे, दि. 1 : ठाण्याच्या पाचपाखाडीतील गुरुकुल ‘बी’ विभाग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली चार वर्षे रखडला होता. अनेक अडचणींमुळे सभासदांच्या नव्या घराचे स्वप्न अधांतरी राहिले होते.या प्रश्नात सभासदांसोबत उभे राहून आवश्यक त्या पातळीवर चर्चा आणि मध्यस्थी केल्यानंतर अखेर सोसायटीने स्वयंपुनर्विकासाचा निर्णय घेतला. सर्व सभासदांच्या उपस्थितीत या कामाचा प्रारंभ झाला. याच वेळी सभासदांना घरभाड्याचे वाटपही करण्यात आले.चार वर्षे रखडलेला प्रश्न आता पुढे जात असल्याचा आनंद सभासदांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. याबद्दल सोसायटीच्या वतीने माझा ‘जनता दरबारा’त नागरी सत्कार करून सभासदांनी व्यक्त केलेल्या भावना मनाला भिडल्या.
या संपूर्ण लढ्यात सोसायटीची कायदेशीर बाजू ठामपणे मांडणारे आणि उच्च न्यायालयात यशस्वीपणे वकीलपत्र सांभाळणारे ॲड. अल्केश कदम यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच स्वयंपुनर्विकासाचे अभ्यासक विद्याधर वैशंपायन यांनी दिलेले तांत्रिक आणि प्रशासकीय मार्गदर्शनही या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे ठरले.
ठाण्यात अनेक सोसायट्या पुनर्विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे अडकून पडल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वयंपुनर्विकास हा सभासदांच्या हक्काचे घर मिळवून देणारा ठोस मार्ग ठरू शकतो. गुरुकुल सोसायटीच्या सभासदांनी घेतलेला हा निर्णय इतर सोसायट्यांनाही दिशा देणारा आहे.सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत, त्यांच्या हक्काच्या घराचा हा प्रवास यशस्वी व्हावा, यासाठी पुढेही माझे पूर्ण सहकार्य राहील.गुरुकुल सोसायटीच्या सर्व सभासदांना नव्या घराच्या स्वप्नाच्या दिशेने पडलेल्या या महत्त्वपूर्ण पावलासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.



































