मुंबई, दि. 25 : नाशिक शहराला स्वच्छ, हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उन्नत नाशिक अभियानाला’ लोकसहभागाची व्यापक जोड देण्याच्या उद्देशाने सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी त्र्यंबकेश्वर येथे पालकमंत्री गिरीश महाजन आणि वॉटरमन ऑफ इंडिया’ आणि रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या विशेष उपस्थितीत पवित्र ब्रह्मगिरी पर्वतावर विशेष वृक्षारोपण करण्यात आले.

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात येत असून, जलसंवर्धन, भूजल पुनर्भरण, नदी संवर्धन, व्यापक वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्त कुंभ यासाठी लोकसहभागातून व्यापक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न ‘उन्नत नाशिक अभियान’च्या माध्यमातून करण्यात येत आहे.

‘हरित कुंभा’साठी लोकसहभागाचे आवाहन

आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक पर्व न राहता पर्यावरणपूरक आणि लोकसहभागातून साकारलेला ‘हरित कुंभ’ ठरावा, यासाठी प्रशासनासोबतच नागरिक, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी, युवा आणि विविध सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रसंगी आ. श्री. हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा