नाशिक, दि. 26 : भाजपा शहर सहकार आघाडीची नैमित्तिक मासिक कामकाज आढावा बैठक २२ ऑगस्ट रोजी पार पडली. भाजपा शहर सरचिटणीस श्री. सुनील देसाई तसेच मार्गदर्शक नाना शिलेदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सहकार क्षेत्रातील जनसंपर्क वाढविणे, संघटनात्मक विस्तार करणे आणि सहकारी संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक व्यापक पद्धतीने काम करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर यावेळी बैठकीचे अध्यक्ष शहर सरचिटणीस सुनील देसाई, नाना शिलेदार ॲड महेंद्र सूर्यवंशी आणि भीमराव कडलग, सह संयोजक सौ. शोभाताई सोनवणे, नगरसेवक वाळू काकड महेंद्र जाधव, मिलिंद देवकुटे, डॉ. गणेश मोटवानी, शिरीष नाईक, श्रीकांत जोशी, संजय देसले, गणेश कुलकर्णी, भोजराज जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
सहकार आघाडीच्या कामकाजाला गती देण्यासाठी दर महिन्याला सहकार विषयक लेखी निवेदने देणे, विविध प्रश्नांवर वृत्तपत्रांमधून प्रसिद्धी मिळविणे तसेच सहकार क्षेत्रातील समस्या, प्रश्न आणि संधींबाबत मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.

मासिक बैठकीचे कामकाज अधिक नियोजनबद्ध करण्यासाठी प्रत्येक कार्यकारिणी सदस्याने सहकार क्षेत्रातील विषय व समस्या बैठकीपूर्वी सुचवाव्यात आणि त्यातून निश्चित अजेंडा तयार करून त्यानुसार प्रत्यक्ष कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहकार आघाडीच्या अधिकृत व्हॉट्सॲप समूहाचा वापर केवळ अधिकृत व सहकारविषयक संवादासाठी करण्याचेही ठरविण्यात आले.

संघटन विस्ताराच्या दृष्टीने प्रत्येक कार्यकारिणी सदस्याने बैठकीस येताना सहकार क्षेत्रातील किमान दोन नवीन व्यक्तींना सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये ‘सहकार सभासद हक्क व कर्तव्य जनजागृती’ करण्यासाठी संस्थांशी संपर्क साधण्याचे निश्चित करण्यात आले. सहकार कायद्यातील नवीन बदल, उपविधी दुरुस्ती, वारसदार, निवडणूक, प्रशासकीय प्रश्न तसेच इतर सहकारविषयक बाबींवर संस्थांच्या सभासदांना मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात येणार आहे.

शहरातील सर्व मंडलांमधील सहकार आघाडीचे संयोजक व सहसंयोजक यांना यापुढे शहर सहकार नियोजन बैठकीस आमंत्रित करण्याचा प्रस्तावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विविध सहकारी संस्था, त्यांचे पदाधिकारी आणि सभासद यांच्याशी सातत्यपूर्ण संपर्क निर्माण करण्यासाठी विशेष संपर्क अभियान राबविण्याचे ठरले.

‘मन की बात – सहकार के साथ’ उपक्रम

भाजपा कार्यालय हे जनतेच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्यावर मार्गदर्शन मिळविण्यासाठी उपलब्ध असावे, या भूमिकेतून ‘मन की बात – सहकार के साथ’ या संकल्पनेनुसार कामकाज व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहकारी संस्थांच्या सभासदांना संघटनेशी जोडणे, त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेणे, तरुण पिढीला सहकार चळवळीत सहभागी करून घेणे आणि सहकार क्षेत्रातील भविष्यातील संधींबाबत तरुणांना मार्गदर्शन करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. सहकारी बँक क्षेत्राबाबत श्री. भोजराज जैन यांनी आगामी कामकाजाचे धोरण मांडले. सहकारी बँका आणि संबंधित क्षेत्राशी अधिक प्रभावी संपर्क निर्माण करण्याबाबतही चर्चा झाली.

यापुढील सहकार आघाडीच्या बैठका विभागनिहाय घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्री. महेंद्र जाधव यांनी निशान गार्डन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस भाजपा सहकार आघाडीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. तसेच श्री. वाळू काकड यांनी आगामी बैठक किंवा कार्यक्रमासाठी त्यांच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा प्रशस्त हॉल तसेच अल्पोपहार व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली.

सहकार क्षेत्रातील राष्ट्रीय बदलांवर मार्गदर्शन अध्यक्ष ॲड. महेंद्र सूर्यवंशी यांनी बैठकीच्या प्रस्तावना व समारोपपर चर्चेत वारणा नगर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील सहकार मॉडेलचा संदर्भ देत परस्परांशी जोडलेल्या विविध सहकारी संस्थांचे नेटवर्क, त्यांच्यातील समन्वय आणि एकमेकांना पूरक ठरणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून सक्षम सहकारी मॉडेल उभे करण्याबाबत मार्गदर्शन केले.

केंद्रात नवीन सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर देशातील सहकार क्षेत्रात होत असलेले बदल, राष्ट्रीय सहकार धोरणाची दिशा तसेच NCDC विधेयक संसदेत मंजूर झाल्याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. मागील बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या कामकाजानुसार ॲड. महेंद्र सूर्यवंशी यांनी संपूर्ण परिवारासह SIR प्रक्रियेत सहभागी होत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक २५६ व २१९ येथील SIR प्रक्रिया पूर्ण केली. तसेच शहरातील विविध गृहनिर्माण संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन SIR संदर्भात कामकाज केले.

या अभियानाच्या माध्यमातून जवळपास १,८०० हून अधिक मतदारांची SIR प्रक्रिया सहकार आघाडीच्या वतीने पूर्ण करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सहकार क्षेत्रातील संस्थांशी थेट संपर्क आणि सामाजिक सहभागाच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण ठरल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा