सिंधुदुर्ग, दि. 22 : वेंगुर्ले पंचायत समितीचे आडेली मतदारसंघाचे सदस्य नितीन मांजरेकर यांची भाजप ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा ओबीसी मोर्चा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर यांनी या संघटनात्मक नियुक्तीची घोषणा केली असून या निवडीचे अधिकृत पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष य प्रभाकर सावंत यांच्या हस्ते ओरोस येथे नितीन मांजरेकर यांना प्रदान करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गची ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली असून त्यामध्ये नितीन मांजरेकर यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन मांजरेकर हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात. गेली अनेक वर्षे ते राजकारणात सक्रीय असून शिवसेनेच्या विभाजनानंतर शिंदे शिवसेना गटाचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख म्हणून त्यानी उत्तम कारागिरी बजावली होती. वेंगुर्ले नगरपालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून काहीकाळ विराम घेतला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मात्र त्यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक लढवत विजय मिळविला होता.

आता मांजरेकर यांची भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या नव्या निवडीबद्दल ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. आरोस येथे त्यांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे. या निवडीबाबत नितीन मांजरेकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे आभार मानले आहेत.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा