३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश; गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य 

सोलापूर, दि. 19 : मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवाभावी वाटचालीच्या निमित्ताने दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय येथे विविध सेवा उपक्रमांच्या नियोजनाबाबत बैठक पार पडली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि प्रभावी शिक्षण मिळावे, तसेच शाळांमधील शिक्षकांची उपलब्धता वाढावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने समुपदेशन प्रक्रियेतून ३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमारजी गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील शाळांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार असून, विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक विकासच नव्हे तर ज्ञान, कौशल्य, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासातून सर्वांगीण प्रगती साधण्यावर शिक्षण विभागाचा भर राहणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. नवनियुक्त शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि सेवाभावाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, विविध समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे, माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप आणि सर्व गटशिक्षण अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा