नवे नियम १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू
नवी दिल्ली, दि. 16 : यूपीआय वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नव्या नियमांनुसार १५ ऑक्टोबर २०२६ पासून २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या काही व्यापारी यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के व्यापारी सवलत दर म्हणजेच एमडीआर लागू होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे-
यूपीआयने पैसे भरताना आता आपल्याला जास्त पैसे द्यावे लागणार का? मग हे शुल्क कोण भरणार? जाणून घ्या… आपल्याशी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरे…
छोट्या दुकानदारांचे काय?
उत्तर : दरमहा यूपीआय क्यूआर कोडद्वारे १ लाख रुपयांपर्यंत रक्कम स्वीकारणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना एमडीआरमधून सूट देण्यात आली आहे.
माझ्या खिशातून पैसे जाणार का ?
उत्तर : नाही. तुम्ही १० हजार रुपयांची वस्तू यूपीआयने घेतली तर दुकानदाराला १० हजार रुपयेच द्यायचे आहेत. एमडीआरच्या नावाखाली ४० रुपये अतिरिक्त घेता येणार नाहीत.
मित्राला २० हजार पाठवले तर?
उत्तर : शुल्क नाही. व्यक्ती-व्यक्तींमधील यूपीआय व्यवहार कोणत्याही रकमेचा असला तरी शुल्कमुक्त राहील. त्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कितीही पैसे पाठवले तरी शुल्क नाही.
दुकानदार शुल्क घेऊ शकतो का?
उत्तर : नाही. यूपीआय वापरल्याबद्दल एमडीआरच्च्या नावाखाली ग्राहकाकडून दुकानदाराला स्वतंत्र शुल्क घेता येणार नाही.
७५ हजार रुपयांची मर्यादा काय आहे?
उत्तर : ७५ हजार रुपयांपेक्षा अधिक पात्र व्यवहारांवर एमडीआरची कमाल रक्कम ३०० रुपये असेल.
यूपीआय अॅप वेगळे शुल्क आकारू शकते का?
उत्तर : नाही. डिजिटल वॉलेट आणि पेमेंट सेवा देणाऱ्या कंपन्यांना ग्राहकांकडून स्वतंत्र प्लॅटफॉर्म शुल्क किंवा व्यवहार शुल्क आकारण्यास मनाई आहे. नव्या एमडीआर नियमामुळे यूपीआयची नेहमीची दैनंदिन व्यवहार मर्यादा (१ लाख रुपये प्रतिदिन) बदललेली नाही.
इतर आवश्यक सेवांसाठी काय आहे नियम ?
रेल्वे, दूरसंचार आणि इंधन यांसारख्या अत्यावश्यक क्षेत्रांसाठी प्रत्येक व्यवहारावर ५ रुपयांचे निश्चित शुल्क असेल. म्युच्युअल फंड, रोखे, शेअर ब्रोकर्स आणि भांडवली बाजाराशी संबंधित काही व्यवहारांसाठी ०.०२ टक्के एमडीआरची तरतूद आहे.
मासिक बिले, मनोरंजन सेवा शुल्क आणि नियमित गुंतवणुकीसाठीची काही स्वयंचलित देयके एमडीआरमधून वगळली आहेत. अशा व्यवहारांवरही नवा नियम सरसकट लागू होत नाही.



























