मुख्यमंत्री फडणवीस यांना गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन
केंद्रीय पथकाकडून आजपासून ११ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राची पाहणी
नवी दिल्ली, दि. 8 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी शाह यांना महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीची आणि राज्य सरकार याबाबत करत असलेल्या उपाययोजनाची माहिती देऊन केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी केली. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी नागपूर विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा केली. या चर्चेमुळे नागपूर विमानतळासाठी आवश्यक असणारी संरक्षण विभागाची २७ एकर जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीत राज्य सरकारने केंद्राकडे पाठविलेल्या आगाऊ प्रस्तावाची प्रतही दिली. राज्यातील सुमारे ३२ जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून जवळपास ८० टक्के तालुके दुष्काळाने बाधित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. दुष्काळाच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांचा दौरा करणार आहे. या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला जाणार असून, राज्याने पाठविलेला प्रस्ताव आणि पथकाचा अहवाल यांच्या आधारे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत मदतीबाबत निर्णय होणार आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत देण्यात येईल,असे सांगून केंद्रीय मंत्री शाह यांनी केंद्र सरकार भक्कमपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वस्त केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उपग्रह प्रतिमांच्या निकषांबरोबरच पावसातील खंड, भूजल पातळी, पिकांचे नुकसान आणि प्रत्यक्ष पाहणी यांसारख्या अन्य निकषांचाही विचार केला जाणार आहे. काही तालुके उपग्रह प्रतिमांच्या निकषात बसत नसले तरी इतर निकषांवर पात्र ठरत असल्यास त्यांचाही विचार केला जाईल. सुमारे २० तालुक्यांमध्येही पिकांच्या नुकसानीच्या आधारे दुष्काळी मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या निधीतून शेतकऱ्यांना तातडीने मदत
केंद्राकडून मदत मिळण्यास वेळ लागू शकतो, त्यामुळे राज्य सरकार आपल्या उपलब्ध संसाधनांतून शेतकऱ्यांना प्रथम मदत करण्याच्या तयारीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सुमारे २३ हजार गावांमध्ये काही पिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित सर्वेक्षणाची कार्यवाहीही वेगाने सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.







































