स्पर्धा परीक्षांसाठी केंद्र सरकारकडून ‘मोफत ऑनलाईन कोचिंग’
नवी दिल्ली, दि. 11 : देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर आणि सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न आता पैशांअभावी अपूर्ण राहणार नाही. ‘आयआयटी-जेईई’, ‘नीट’ आणि ‘यूपीएससी’ यांसारख्या कठीण स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच देशव्यापी ‘मोफत ऑनलाईन कोचिंग’ योजना सुरू करणार असल्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.
नवी दिल्लीतील शैक्षणिक परिषदेत संवाद साधताना पंतप्रधानांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचे सूतोवाच केले. “शिक्षणाचे व्यापारीकरण रोखणे आणि देशातील शेवटच्या घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवणे, हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. पैशांच्या कमतरतेमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाया जाणार नाही.” असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
देशातील सर्वोत्तम शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ आता थेट ग्रामीण आणि दुर्गम भागातील सामान्य विद्यार्थ्यांनाही घरबसल्या पूर्णपणे मोफत घेता येणार आहे. सध्याच्या काळात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या कोचिंगचे शुल्क लाखो रुपयांच्या घरात गेले आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले हुशार विद्यार्थी गुणवत्ता असूनही मागे पडतात, तर अनेक पालकांना कर्जबाजारी व्हावे लागते.
आवश्यक पात्रता
योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी असून विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ‘आयआयटी’ आणि ‘नीट’ साठी अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, तर ‘यूपीएससी’ साठी पदवीच्या अंतिम वर्षात असलेले किंवा पदवीधर तरुण विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. नोंदणीसाठी आधारकार्ड, शैक्षणिक गुणपत्रिका आणि पालकांचा – उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
कोणकोणत्या प्रादेशिक भाषांमध्ये कोचिंग ?
नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून हे कोचिंग केवळ इंग्रजी किंवा हिंदीपुरते मर्यादित न ठेवता, मराठीसह देशातील एकूण १२ ते १५ प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. व्हिडिओ लेक्चर्ससोबतच सराव प्रश्नपत्रिका (नोट्स आणि ई-बुक्सही) मराठीत विनामूल्य डाऊनलोड करता येतील. केंद्र सरकारच्या ‘भाषिणी’ कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे देशातील सर्वोत्तम शिक्षकांचे इंग्रजीतील संवाद विद्यार्थ्यांना मराठी ऑडिओ आणि सब-टायटल्ससह रिअल टाईममध्ये पाहता येतील.
ऑनलाईन नोंदणी कधीपासून ? केंद्र सरकारच्या शिक्षण आणि तंत्रज्ञान
मंत्रालयाकडून सध्या या राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाच्या पूर्वतयारीनंतर, आगामी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच मार्च किंवा एप्रिल २०२७ पासून अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे.



























