मुंबई, दि. 20 : डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार शिक्षक प्रतिनिधींनी आमदार प्रमोद जठार यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन आपल्या विविध समस्या मांडल्या. शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळावी, यासाठी शिक्षक भरती जिल्हासंवर्ग करण्यात यावी तसेच किमान ८० टक्के भरती स्थानिक उमेदवारांमधून करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने डी.एड. बी.एड. पात्रताधारक सुशिक्षित बेरोजगार असून, स्थानिक उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातच रोजगाराची संधी मिळावी, अशी भूमिका शिक्षक प्रतिनिधींनी आमदार प्रमोद जठार यांच्यासमोर मांडली. जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता असताना स्थानिक पात्र उमेदवारांना रोजगारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासन स्तरावर हा प्रश्न प्रभावीपणे मांडावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके,स्वानंद रानडे, संतोष साखरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर, रुपेश कदम, प्रतीक देसाई, शिक्षक संघटना अध्यक्ष सुदर्शन मोहिते यांच्यासह डी.एड. बी.एड. शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात डी.एड. आणि बी.एड. पदवीधारक तरुण-तरुणींशी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सविस्तर चर्चा झाली. उच्च शिक्षण घेऊनही केवळ योग्य संधींअभावी रोजगारापासून वंचित राहण्याची वेळ आपल्या सुशिक्षित तरुणांवर यावी, ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे. या युवावर्गाच्या व्यथा, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या रास्त मागण्या मी अतिशय गांभीर्याने समजून घेतल्या आहेत. माझ्या तरुण बंधू-भगिनींनो, तुमचा हा संघर्ष आता केवळ तुमचा राहिलेला नाही; तो माझाही लढा आहे. कोकणातील भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचा रोजगार आणि न्याय मिळवून देण्यासाठी मी शासन दरबारी शेवटपर्यंत लढेन, हा माझा तुम्हाला शब्द आहे, अशी ग्वाही आ . प्रमोद जठार यांनी दिली .












































































