भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई, दि. 27 : एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील सुनील गाढवे हे रोहित पवार यांचा उजवा हात असल्याचा खळबळजनक आरोप करीत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्या दोघांची एकत्रित छायाचित्रेही गुरुवारी पत्रकार परिषदेत सादर केली. शरद पवार यांच्याही सोबतच्या छायाचित्रांचा यात समावेश आहे. आता सुनील गाढवे यांच्याशी आपला नेमका काय संबंध आहे, ते रहित पवार यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी श्री. बन यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत जवळपास सहा आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. ज्या सुनील गाढवेंवरून भाजपा, अभिमन्यू पवार, देवेंद्रजी फडणवीस, पुण्याच्या महापौर यांच्यावर रोहित पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात आहेत ते सुनील गाढवे कोण आहे याची सविस्तर माहिती घेतली असता ते रोहित पवार यांच्या अत्यंत जवळचे असून पुण्यातील एमपीएससीचे आंदोलन तसेच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोघे एकमेकांसोबत काम करत असल्याचे उघडकीस आल्याची माहिती श्री. बन यांनी दिली.

रोहित पवार यांचे पुण्यातील सगळी कामे सुनील गाढवे पाहतात. फक्त रोहित पवारच नाही तर शरद पवार साहेबांसोबतही वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदांमध्ये सुनील गाढवे उपस्थित असल्याचे छायाचित्रांमध्ये पहावयास मिळत असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः रोहित पवार या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार आहेत, असा सवाल श्री. बन यांनी उपस्थित केला.

आता नाकाने कांदे सोलणारे रोहित पवार यावर मूग गिळून गप्प बसणार आहेत का? आपली भूमिका जाहीर करणार आहेत का? तुम्हाला विद्यार्थ्यांचे हित महत्त्वाचे आहे ना? सुनील गाढवे आणि आपले काय संबंध आहेत? पुण्यात सुनील गाढवेंचे कोणते कार्यक्रम रोहित घेतले आहेत? एमपीएससीच्या आंदोलनात या सुनील गाढवेचा संबंध काय आहे? किती वर्षांपासून आपण त्यांना ओळखतो? कुणामार्फत त्यांची ओळख झाली? याचा खुलासा रोहित पवारांनी महाराष्ट्रातल्या जनतेला करावा, अशी मागणी श्री. बन यांनी केली.

सुनील गाढवे यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते अभिमन्यू पवार यांचे पीए होते, असा आरोप केला जात आहे. मात्र अभिमन्यू पवार यांच्याशी बोलणे झाले असता आपण सुनील गाढवेंना कधीही पीए म्हणून ठेवले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी, अनेक शिष्टमंडळे घेऊन अभिमन्यू पवार मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यात हे सुनील गाढवे होते. परंतु त्यांचा पीए म्हणून सुनील गाढवेंनी काम केले नव्हते, असे श्री. बन यांनी यावेळी सांगितले.

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य मोहनजी भागवत तेथे जाऊन भारतीय संस्कृती काय आहे, ते सांगणार असल्याने जनाब संजय राऊत यांना मिरच्या झोंबल्या आहेत. कारण जागतिक व्यासपीठावर ना संजय राऊतांना किंमत आहे, ना उद्धवजी ठाकरेंना किंमत आहे, ना आदित्य ठाकरे यांना भाव दिला जातोय. संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ घेऊन पाकिस्तानात जाऊन भाषण करावे, असेही श्री. बन यांनी सुनावले.

अमेरिकेत विचारस्वातंत्र्य आहे आणि भारतातही विचारस्वातंत्र्य आहे. संजय राऊत, भारतात विचारस्वातंत्र्य नसते तर तुम्ही रोज सकाळी दहा वाजताची गटारगंगा वाहता, ती सुरू राहिली नसती. उद्धवजी ठाकरेंना जाऊन विचारा की कशा पद्धतीने हुकूमशाही केली जात होती. कार्टून फॉरवर्ड केले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणे, याला हुकूमशाही म्हणतात. अर्णब गोस्वामीला घरातून अटक करणे याला हुकूमशाही म्हणतात. विचारस्वातंत्र्य नसते तर तुमची गटारगंगा सुरू झाली नसती, याचे भान संजय राऊत यांनी ठेवावे, असे श्री. बन म्हणाले.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा