‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नाशिक, दि. 29 : ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027’चा कालावधी लक्षात घेता विविध कामे वेगात सुरू आहेत. सर्व संबंधित यंत्रणा ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या निमित्ताने उत्तम सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साधुग्रामची जागा ₹2500 कोटी खर्च करून कायमस्वरूपी अधिग्रहीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. या जागेचा उपयोग भविष्यातही कुंभमेळ्यासाठीच व्हावा, यासाठी त्याची योग्य पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यासाठी रस्ते, पायाभूत सुविधा तसेच भाविकांसाठी आवश्यक विविध नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहेत. साधुग्रामच्या जागांबाबत काही नागरिक व शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यास त्या संवेदनशीलतेने दूर करण्यात येतील. शक्य त्या सुधारणा करण्यात येऊन संबंधितांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्यासाठी खर्च होणाऱ्या निधीतून नाशिक, त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्ह्यात दीर्घकाळासाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, याची जाणीव सरकारला असून कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिक निश्चितपणे या कामांचे स्वागत करतील. सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी मर्यादेत वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्वांच्या सहकार्याने सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी दर्जेदार, पारदर्शक पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण करून हा कुंभमेळा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि यशस्वी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रश्न विचारण्याची आणि नव्या विचारांचा स्वीकार करण्याची परंपरा होय. महाकुंभ या भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेचा मोठा आविष्कार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून देशभरातील विविध भक्ती परंपरांचा संगम नाशिकमध्ये अनुभवता येणार आहे. पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत, राजस्थानपासून गुजरातपर्यंत तसेच पूर्वोत्तर भारतातील विविध भागांतील भक्ती परंपरांचे दर्शन या सोहळ्यात घडणार आहे. भक्ती संगमाच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात होत असून 31 ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण होईल. साधूसंतांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या सहकार्याने ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027’ निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी सिंहस्थ सहाय्यक समितीची पुस्तिका, संकेतस्थळ आणि ॲपचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच यावेळी ‘आपला कुंभपर्व माझी जबाबदारी’ ही प्रतिज्ञा घेण्यात आली.
‘कुंभ दूत’ उपक्रमाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवात
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांची आवश्यकता भासणार असल्याने प्राधिकरणामार्फत ‘कुंभ दूत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सिंहस्थ महाकुंभबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे सिंहस्थ कुंभमेळा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासोबत नियोजनात विद्यार्थ्यांची मदत होणार आहे.
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या व्यापक आयोजनात तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. प्रत्यक्ष मोठ्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांना गर्दी व्यवस्थापन, स्वयंसेवा, समन्वय, शिस्त आणि नागरिकांशी संवाद यांचा अनुभव घेता येणार आहे.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार रावल, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत, संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते.












































































