केंद्र सरकारचा हिरवा कंदील, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
मुंबई, दि. 13 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मोठी बातमी दिली आहे की, लवकरच मुंबई लोकल ट्रेनचा अनुभव बदलणार आहे. 2029 पर्यंत सर्व लोकल एसी आणि मेट्रोसारख्या आधुनिक होतील. मुंबईला एकूण 238 नव्या एसी लोकल ट्रेन मिळणार आहेत. विशेष म्हणजे, सेकंड क्लासच्या भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल.
मुंबईच्या लोकल ट्रेनला आधुनिक बनवू, असा निर्णय घेण्यात आला होता. मेट्रो सारख्या लोकल मिळाव्यात अशी चर्चा झाली होती. पण त्यात विलंब होत होता. ज्या गतीने काम सुरू होतं. त्या गतीने 2030च्या पूर्वी ट्रेन मिळाल्या नसत्या. त्यामुळे मध्यंतरी केंद्रीय रेल्वे मंत्र्याशी बैठक झाली, त्यात लोकलबाबतची चर्चा केली. काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत निर्णय घेतला. केंद्राची तीन कोच फॅक्ट्री आहेत. तिथे वेगाने ट्रेन बनवण्याचं काम सुरू आहे. वंदे भारत ट्रेन बनत असलेल्या कारखान्यात ट्रेन तयार होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाडेवाढ होणार नाही
2027 मध्ये पहिली मालिका ट्रेनची यावी. त्यानंतर 2029 पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, सुंदर आणि एसी व्हाव्यात. एसी झाल्या तरी सेकंड क्लासचं भाडं वाढणार नाही. मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. देशातील आधुनिक पद्धती तयार होत आहे, असं सांगत आधुनिक ट्रेन देत असल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
पुढच्या वर्षीपासूनच लोकल येणार
मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार 238 एसी लोकल केंद्राने मंजूर केल्या आहेत. या लोकलसाठी 2030 पर्यंत करावी प्रतिक्षा करावी लागणार होती. आता मात्र 2027 पासून एसी लोकल सेवेत येण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षीच मुंबईकरांना एसी लोकलचा लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर 2029 पर्यंत सर्वच एसी लोकल ताफ्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.












































































