मुंबई, दि. 21 : जनाब संजय राऊत यांनी सहकार क्षेत्र देशभरात पोहोचवणारे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना पत्र सहकारी बँकिंग क्षेत्राबाबत लिहिण्याऐवजी उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांना पत्र लिहून अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी नेमके काम काय केले, याचा हिशोब मागितला असता, तर बरे झाले असते. 25 वर्षे खासदार असूनही ज्या संजय राऊतांना एक पतसंस्था सुरु करता आली नाही, ज्यांना सहकारात फक्त स्वाहाकार जमतोय, फक्त मुंबई लुटायची जमते आणि स्वतःची घरे भरायची जमतात त्या संजय राऊत यांनी सहकाराबद्दल बोलू नये, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सहकार क्षेत्रामधून देशाची क्रांती होऊ शकते, हे काँग्रेसला सत्तर वर्षांमध्ये सुचले नाही. सहकार क्षेत्र देशभरात पसरवण्याचे काम अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात होत आहे. पहिले सहकार मंत्रालय अमितभाईंच्या नेतृत्वात सुरू झाले. याआधी ती कल्पनाही कोणी केली नव्हती. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचे, टक्केवारीचे जाळे विणून महाराष्ट्र, मुंबई पोखरण्याचे काम केले. रोज 100 कोटी रुपये वसुली करून जो हात उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, संजय राऊत यांनी मारला तो महाराष्ट्राने पाहिल्याने तुम्हाला घरी बसवले. संजय राऊत, तुम्ही 25 वर्षं खासदार आहात. एक बँक सोडा, भांडुपच्या गाढव नाक्यावर एक पतसंस्था तरी सुरू केली का?, असा सवाल श्री. बन यांनी उपस्थित केला.

देवाभाऊंना काय कळते आणि काय नाही, हे महाराष्ट्र पहातोय, असे सांगून श्री. बन म्हणाले मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना काय कळत होते? देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जातोय आणि महाराष्ट्रात सहकार क्रमांक एकवर आहे. जी सहकार चळवळ महाराष्ट्रात रुजली, वाढली, ती देशभर वाढवण्याचे काम आम्ही अमितभाईंच्या नेतृत्वात करत आहोत. संजय राऊत म्हणतात की, सगळे काही गुजरातमध्ये देताय. पण संजय राऊत, तुम्ही सगळे काही राहुल गांधींच्या, सोनिया गांधींच्या चरणावर अर्पण करताय.

संजय राऊत म्हणतात की, धनुष्यबाणावर दरोडा टाकला. 2019 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर दरोडा टाकणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुम्ही होतात. कारण महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभाऊंच्या नेतृत्वात युतीला बहुमत दिले होते. दरोडा टाकण्याची परंपरा उद्धवजी ठाकरेंनी सुरू केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला दरोडा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनी मिळून टाकला होता. त्यामुळे तुम्ही दरोड्याची भाषा करू नका, असे बन यांनी सुनावले.

धीरेंद्र शास्त्री हे राष्ट्रपतींना भेटल्याने संजय राऊत यांना मिरची लागली. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’, असे म्हणणारे वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. आता राष्ट्रपती भवनात एखादे धार्मिक गुरू, हिंदुत्ववादी लोक गेले तर तुम्हाला मिरची लागते. तेच जाळीदार टोप्या घालून, हिरवी शाल पांघरून काही लोक पूर्वी काँग्रेसच्या काळात रोज राष्ट्रपती भवनात फिरत होते, तेव्हा तुमचे पोट दुखत नव्हते. आता खऱ्या अर्थाने जनाब झालात आणि तुमची वैचारिक सुंता झाली आहे, अशा शब्दात श्री. बन यांनी चांगलेच फटकारले.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा