भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघाती सवाल

मुंबई, दि. 25 : जनाब संजय राऊत, काँग्रेसच्या काळात आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांना आंदण देण्यात आल्या. भ्रष्टाचाराचे कुरण म्हणूनच आदिवासी शाळांचे वाटप काँग्रेसच्या काळात झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट दिसते. सर्वाधिक आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांच्या आहेत आणि त्या आश्रमशाळांचे कमिशन खाण्याचा घाट घातल्याचे लक्षात आल्याने सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली. सर्वाधिक भ्रष्टाचार आदिवासी विभागात असल्याचा आरोप करताना सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू झाल्याबद्दल तुम्ही काँग्रेसच्या माजी खासदाराला जाब का विचारला नाही, असा सवाल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांना हक्क देण्याचे काम राज्य सरकार करते. पण मधले संस्थाचालक, काँग्रेसचे दलाल विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून स्वतःची घरे भरताहेत. पुण्यातले विद्यार्थी आंदोलन करत आहेत, गडचिरोलीत विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू होतोय. संस्थाचालक तर सगळे काँग्रेसचे आहेत. सरकार देत असलेल्या अनुदानात भ्रष्टाचार करण्याचे काम काँग्रेसचे नेते करत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानामधून कमिशन घ्यायचे आणि त्यातून काँग्रेसचे कार्यक्रम करायचे हेच धोरण आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आधी काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांमध्ये नेमके काय चाललेय, याचे उत्तर शोधावे, असे श्री. बन यांनी सुनावले.

कुठल्याही मंत्र्याच्या जावयाला एकही कंत्राट दिले नसल्याचे ठणकाऊन सांगत श्री. बन म्हणाले, संजय राऊत, तुमच्याकडे पुरावे असतील द्या. उलट कोविडकाळात तुमच्या महापौरांच्या मुलाला, जावयाला कशा पद्धतीने कंत्राटे दिली होती, खिचडीत किती टक्के घोटाळा केला, हा इतिहास महाराष्ट्राला माहित आहे.

शाळांची स्थिती सुधारली पाहिजे, या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. उलट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर ग्रामीण भागात शाळा अतिशय चांगल्या अवस्थेत आल्या आहेत. काँग्रेसचे सरकार असताना शाळांची काय अवस्था होती, हे सगळ्यांना माहिती आहे. आज ग्रामीण भागातील शाळांना पक्क्या इमारती, चांगले रस्ते, वीज, संगणक अशा सगळ्या सुविधा देण्याचे काम सरकारच्या वतीने केले जाते. बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात. पण सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे.

मतांसाठी राऊतांचा कुंभमेळ्याला विरोध

हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो हिंदू एकत्र येणार आणि तेच तुम्हाला नकोय. याचठिकाणी इज्तेमा आयोजित करण्यात आला असता, सरकारने मदत केली असती तर मात्र त्याचे स्वागत केले असते. नमाज पठण स्पर्धा घेतली असती तर तुम्ही उत्साहाने उड्या मारल्या असत्या. कुंभमेळ्याला टार्गेट करायचे आणि औरंगजेब फॅन क्लब चालवायचा, हे उबाठा गट, काँग्रेस, राहुल गांधींचे धोरण आहे. कारण कुंभमेळा टार्गेट केले की औरंगजेब, अफजलखानाची वंशावळ खुश होईल. पण लक्षात घ्या, बारा वर्षांनंतर हिंदू कुंभमेळ्यात एकत्र येतोय आणि या कुंभमेळ्याचे स्वागत आम्ही मोठ्या थाटात, उत्साहात करणार. मतांसाठी तुम्ही कितीही लांगूलचालन केले, तरी काहीच फरक पडणार नाही. कुंभमेळ्यात देशभरातील हिंदू नागरिक येतील. त्यांना सुविधा देणे, त्यांची व्यवस्था करणे हे सरकारचे कर्तव्य असते आणि त्यासाठीच हा कुंभमेळ्याचा खर्च होत असल्याचे श्री. बन यांनी स्पष्ट केले.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा