मुंबई, दि. 29 : आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारणाव्दारे राहुल गांधींचे ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न असून तो प्रयत्न काँग्रेसने थांबवावा असे म्हणत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसला फटकारले आहे.आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कॉंग्रेस राजकीय स्वार्थ साधत आहे असाही आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
आपल्या एक्स हँडलवरील शुक्रवार दि.२८ ऑगस्ट रोजी केलेल्या पोस्टमध्ये बावनकुळे म्हणतात, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा केली असून, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत लिखित आश्वासनही दिले आहे. सरकार विद्यार्थ्यांशी तीनदा चर्चा करू शकते, गरज पडल्यास चौथ्यांदा नव्हे तर हजारव्यांदा संवाद साधण्याचीही तयारी ठेवते मग प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट का? विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींच्या पुढील महाराष्ट्र दौऱ्यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा काँग्रेसचा डाव हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका असे म्हणत बावनकुळे पुढे म्हणतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि शैक्षणिक संधी वाढविण्यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे हा सरकारचा उद्देश आहे; मात्र काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचविण्याची अधिक चिंता असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे.आदिवासी समाजाच्या प्रश्नांशी खरोखरच काँग्रेसला आस्था असेल, तर त्यांनी विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनवण्याऐवजी सरकारसोबत संवाद साधावा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका.













































































