अमरावती , दि. 22 : नवराष्ट्र युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘अमरावती युथ फेस्टिवल २०२६’चे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थित युवकांशी त्यांनी संवाद साधला. तसेच फेस्टिव्हलमधील विविध प्रदर्शनांतील स्टॉल्सना भेट देऊन तरुणांच्या कल्पकता, नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिले.
युवा शक्ती हीच राष्ट्राच्या प्रगतीची खरी ताकद आहे. त्यांच्या विचारांना, स्वप्नांना आणि कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळाले, तर त्यातून समाज आणि राष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते. अशा उपक्रमांमधून तरुणांना आपले कौशल्य आणि क्षमता सादर करण्याची संधी मिळते, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अमरावतीच्या युवा शक्तीला नवी दिशा, नवे व्यासपीठ आणि नव्या संधी मिळोत, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
या सोहळ्याला आ. प्रविण पोटे, आ प्रवीण तायडे, रविराज देशमुख, जयंत डेहनकर, नगरसेवक ऋषिकेश देशमुख, चेतन गावंडे, सुनील खराटे, चेतन पवार, नवराष्ट्र युथ फाउंडेशनचे अध्यक्ष हिमांशू पाटील, डॉ. प्रशांत ठाकरे महाराज यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







































