मुंबई, दि. 19 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया-इंडिया (UWA) च्या मुंबई कॅम्पसचे उदघाटन व स्मृतीफलकाचे अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन क्षेत्राची राजधानी आहे. आगामी काळातील गरजा लक्षात घेऊन मुंबईला जगातील ज्ञान, नवकल्पना, तंत्रज्ञान आणि गुणवत्तेचे प्रमुख केंद्र बनवण्याचे राज्य सरकारचे ध्येय आहे. या दृष्टीने मुंबईजवळ उभारण्यात येत असलेले ‘मुंबई 3.0’ हे अत्याधुनिक, भविष्योन्मुख आणि कार्यक्षम शहर ठरणार असून, येथे एज्युकेशन सिटी, मेडिसिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) यांसारख्या आधुनिक परिसंस्था उभारल्या जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ मुळे उच्च शिक्षणाचा दृष्टिकोन बदलला असून, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याची नवी दारे उघडली आहेत. पूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागत होते, परंतु आता जगातील नामांकित विद्यापीठे भारतात आणि महाराष्ट्रात येत आहेत. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘ग्रुप ऑफ 8’मधील भारतात कॅम्पस सुरू करणारे पहिले विद्यापीठ म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया-इंडियाने मुंबईची निवड केली असून, ही निवड आजच्या मुंबईचे वाढते महत्त्व अधोरेखित करणारी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या या प्रवेशामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि महाराष्ट्रातील उद्योग, फिनटेक, स्टार्टअप्स व वित्तीय संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव एकाच वेळी मिळणार आहे. एआय, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, दुर्मिळ खनिजे, हरित ऊर्जा आणि प्रगत उत्पादन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहसंशोधन आणि नवकल्पनांवर काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची क्षमता आणि महाराष्ट्रातील गुणवत्ता एकत्र येऊन भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा एक मजबूत पाया रचला जाईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.















































































