मुंबई, दि. 19 : आजच्या घडीला महाराष्ट्र दोन प्रमुख गोष्टींमुळे जगाच्या नकाशावर आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुंबई आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या राज्याचे अद्वितीय व ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!” अशा अत्यंत गौरवपूर्ण शब्दांत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. मुंबईत साकारल्या जाणाऱ्या ‘मेडिसिटी’ प्रकल्पासाठी अमेरिकेच्या प्रसिद्ध ‘क्लिव्हलँड क्लिनिक’ सोबत महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार पार पडला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून अमेरिकन राजदूतांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ‘मेडिसिटी’ प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. यासाठी जागतिक कीर्तीच्या ‘क्लिव्हलँड क्लिनिक’सोबत महाराष्ट्र सरकारने सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. यावेळी महाराष्ट्र आणि अमेरिका यांच्यातील आरोग्य, तंत्रज्ञान आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

कार्यक्रमात बोलताना अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आणि कार्यशैलीचे मोकळ्या मनाने कौतुक केले. ते म्हणाले, “मी जगभर फिरलो आहे आणि अनेक जागतिक नेत्यांना भेटलो आहे. मात्र तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा असलेला, डायनॅमिक आणि आपल्या कामाबद्दल नितांत आस्था असलेला नेता आहे.”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव राष्ट्रीय राजकारणातही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अलीकडेच त्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर विरोधकांकडूनही त्यांच्या राष्ट्रीय भूमिकेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. अशातच आता अमेरिकन राजदूतांनी केलेल्या कौतुकामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जात असल्याचे अधोरेखित झाले आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा