भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली दौऱ्याची माहिती

मुंबई, दि. 23: मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर जिल्हा, उत्तर महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्याने स्वत: मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा, धीर देण्याचा प्रयत्न देवाभाऊ करत आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी येत्या दोन दिवसांत त्यासंदर्भात सरकारकडून अध्यादेशही जारी केला जाणार असल्याची माहिती भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देवाभाऊंना नव्हे तर जनाब संजय राऊतना इव्हेंट करण्याची सवय आहे. महाविकास आघाडी सरकार आणि त्यांचे मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे इव्हेंटबाज होते. मातोश्रीच्या पलीकडे तुमचा इव्हेंट कधी गेला नाही. जे कधी बांधावर गेले नाहीत, ज्यांना ऊस जमिनीवर येतो का जमिनीखाली हे माहित नाही, सोयाबीन काय असते हे माहित नाही, अशा संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलू नये. शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी करणारे, शेती वर्क फ्रॉम होम करता येईल का, याची संकल्पना मांडणारे उद्धव ठाकरे होते, अशी खिल्ली श्री. बन यांनी उडवली.

कोण छोटा शकील आहे आणि कोण शार्पशूटर आहे हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये, असे फटकारत श्री. बन म्हणाले, ज्ञानेश कुमार छोटा शकील असतील तर जनाब संजय राऊत अजमल कसाब आहेत. अजमल कसाबने मुंबईत येऊन गोळ्या झाडत सर्वसामान्य मुंबईकरांची हत्या केली त्याच पद्धतीने तुम्ही लोकशाहीची हत्या करता. संविधानाने दिलेले निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय तुम्हाला चुकीचे वाटतात. संविधानाच्या संस्थांवर आरोप करायचे, संभ्रम निर्माण करायचा आणि त्यांना बदनाम करत त्या संविधानाची हत्या करण्याचे पाप संजय राऊत करत असल्याचे देशातल्या जनतेने ओळखले आहे.

नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह यांच्या खंबीर नेतृत्वाला घाबरून तुमची पळता भुई थोडी झाली आहे. 140 कोटी जनतेचे मोदीजींच्या पाठीशी असलेल्या आशीर्वादाला तुम्ही घाबरलात. देशाची जनता आपल्याला कधीही कायदेशीर मार्गाने निवडून देणार नाही. संविधानाच्या चौकटीत आपल्याला निवडून येता येणार नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून मोदीजी ज्या दिमागी नक्षलीचा उल्लेख करतात त्या दिमागी नक्षलींचे मोहरे राहुल गांधी आणि संजय राऊत आहेत, असा प्रहार श्री. बन यांनी केला.

संजय राऊत, उद्धव ठाकरे म्हणतात की महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालची निवडणूक रद्द करा. मग केरळमध्ये काँग्रेस जिंकली, तामिळनाडूत टीव्हीके जिंकली, कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली तर तिथे सगळी निवडणूक प्रक्रिया योग्य होती का? केरळमध्ये एसआयआर झाल्यानंतरही काँग्रेस जिंकली. तामिळनाडूत टीव्हीके जिंकली तर उद्धव ठाकरे तामिळनाडूची निवडणूक बरखास्त करण्याची मागणी करणार आहेत का? कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये जिंकता तेव्हा निवडणूक आयोगात आलबेल असते, तिथली एसआयआर प्रक्रिया चांगली असते. याला दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा म्हणतात. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भाजपा जिंकली की मात्र ईव्हीएम, एसआयआरवर खापर फोडू लागता. हिंमत असेल तर कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमधील सरकार बरखास्त करा. कारण तिथेही याच निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्यात, असे श्री. बन यांनी सुनावले.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा