आमदार विक्रम पाचपुते यांचा प्रहार

मुंबई, दि. 29 : विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता ही कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. म्हणूनच या विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करणे थांबवले पाहिजे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अर्बन नक्षली तयार केले जात असल्याचे चित्र तयार होऊ लागल्याचा प्रहार आ. विक्रम पाचपुते यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत आ. पाचपुते बोलत होते. विद्यार्थी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने या आंदोलनाला राजकीय वळण देण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेससह इतर लहानमोठ्या पक्षांचा पाठिंबा घेण्याचा दुर्दैवी प्रकार सुरू झाला असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात या अनुषंगाने सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आजवरचा अनुभव पाहता कोणतीही परीक्षा पुढे ढकलली तर विद्यार्थ्यांमध्ये शंका अथवा संभ्रमावस्था निर्माण होत असे. पण या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी सकारात्मक पद्धतीने स्वागत केल्याचे सांगत आ. पाचपुते यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.

रोहित पवार आणि त्यांच्या अर्धांगिनी कुंतीताई यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आ. पाचपुते यांनी रोहितदादांना भविष्यात सद्बुद्धी मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. सध्या राज्यात दुष्काळ आहे. दुष्काळाचे संकट ही केवळ राज्य सरकारची जबाबदारी नसून सत्ताधारी आणि विरोधकांची सामूहिक जबाबदारी आहे. शरद पवार साहेबांनी कायम सांगितले की आपत्तीत सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. त्यांच्याकडून रोहितदादांनी बोध घेतला पाहिजे. त्यांनी योग्य मुद्द्यांना हात घालावा. कारण गेल्या काही दिवसांपासून ते अनेक विषयांवर चर्चा करतात, दिवसात दहा दहा मुद्दे घेतात. पण दुर्दैवाने प्रसारमाध्यमेही आता त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, असे आ. पाचपुते म्हणाले.

विद्यार्थ्यांनी या राजकीय बाबींना बळी न पडता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करत आ. पाचपुते म्हणाले, लवकरच राज्य सरकारच्या वतीने विक्रमी नोकरभरती करण्यात येणार आहे. व्ही. राधा समिती मुंबईत विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत आहे. विद्यार्थ्यांच्या काही शंका, समस्या, सूचना असतील त्यांनी या समितीला दिल्या पाहिजेत. ही समिती अतिशय उत्तम पद्धतीने काम करते आहे. याची दखल खुद्द आयोगानेही घेतली आहे. त्यामुळे समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढच्या प्रक्रिया पार पडतील आणि सर्व परीक्षा पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पाऊल उचलले जाईल.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा