भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली पोलखोल
मुंबई, दि. 2 : काही पत्रकार आपल्याला प्रसिद्धी देत नाहीत या आकसापोटी आ. रोहित पवार यांच्या गुंडांनी पत्रकारांवर केलेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी हा अभाविपचा कार्यकर्ता असल्याची मखलाशी रोहित पवार यांनी केली आहे. मात्र त्या आरोपीने आंदोलनाआधीच रोहित पवारांच्या समर्थनार्थ केलेल्या ट्वीटचे पुरावे सादर करीत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पोलखोल केली. यामुळे विद्यार्थी आंदोलनात आपले गुंड घुसवत पत्रकारांविरोधात भूमिका घेण्याचे रोहित पवार यांचे षडयंत्र उघड झाल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रोहित पवार नौटंकी करत असले तरी आरोपी सिद्धांत पाचंगे याने रोहित पवारांच्या ट्वीटखाली त्यांच्या समर्थनार्थ ट्वीट करत त्यांची बाजू घेतल्याचे धडधडीत दिसत असल्याचे स्पष्ट करीत श्री. बन म्हणाले, हा तुमचा कार्यकर्ता आणि गुंड आहे. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या या आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी आणि हा हल्ला घडवून आणल्याबद्दल रोहित पवार यांच्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी. रोहित पवार यांनी पत्रकारांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी.
देवेंद्रजी फडणवीस जनतेची सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहेत. महाराष्ट्राचे गृहखाते ते अतिशय सक्षमपणे चालवत आहेत. संजय राऊत, तुमचे गृहखाते असताना अनिल देशमुख काय धंदे करत होते? उद्धव ठाकरे कशा पद्धतीने वागत होते, हा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे. एका उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके पेरणाऱ्यांनी देवाभाऊंवर टीका करू नये. पालघरमध्ये साधू हत्याकांड झाले तेव्हा तुम्ही काय करत होता? मनसुख हिरेन यांची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी काय काय केले, याला जनतेची दिशाभूल करणे म्हणतात. कुठल्याही आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही मात्र ‘वाझे काय लादेन आहे का’, म्हणत आरोपीला पाठीशी घालण्याचे आणि पुरावे नष्ट करण्याचेच काम केले होते, असा हल्लाबोल श्री. बन यांनी केला.
संजय राऊत सांगताहेत की, त्यांचे कुटुंबीय कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभाग घेणार आहे. आता संजय राऊतांच्या मालकाने अभिजीत दीपकेला विष्णूचा अवतार म्हटल्याने त्यांना अभिजीत दीपकेचे पाद्यपूजन करणे गरजेचे वाटते. मात्र या देशात कॉक्रोचचा इतिहास नाहीय. येथील माता-भगिनी कॉक्रोच दिसला की चपला काढून मारतात, हा इतिहास आहे. या कॉक्रोचनी महाराष्ट्राचा नेपाळ करण्याचा आणि देशात धुडगूस घालण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राखाली मावळे असतात तिथे झुरळे दाखवत अपमान केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मावळ्यांनी रक्त सांडले तेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. अफजल गुरू, उमर खालिद , याकूब मेमनला हिरो मानतात त्यांना हिंदवी स्वराज्य, शिवतीर्थ कळणार नाही, अशी खरमरीत टीकाही श्री. बन यांनी केली.
हिटलर आणि मुसोलिनीप्रमाणे कारभार करणारे उद्धव ठाकरे होते, असा प्रहार करत श्री. बन म्हणाले, एक पोस्ट फॉरवर्ड केली म्हणून म्हणून तुरुंगात टाकणारे तुम्हीच होता. आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक वारशाने चालतो. राहिला प्रश्न आंदोलनाला आझाद मैदानात परवानगी दिली आणि शिवाजी पार्कवर का दिली नाही? तर आझाद मैदान हे आंदोलन करण्यासाठीचे स्थळ असल्याने उबाठा गट आणि मनसेला आझाद मैदानावर परवानगी दिली. अभिजीत दीपके यांच्या काँग्रेस जिताव पार्टीने आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी मागितली असती, तर तिथे निश्चितपणे दिली असती. न्यायालयाने शिवाजी पार्क शांतता झोन म्हणून जाहीर केले आहे. शिवाजी पार्कातील स्थानिक नागरिकच कॉक्रोचला विरोध करत मैदानात उतरले आहेत.




































































































