दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ७,५०० कोटींच्या तरतुदीस मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई, दि. 28 : राज्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या ३०४ तालुक्यांमधील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, यासाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांच्या भरघोस निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या संकटाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या पीकनुकसानीपोटी द्यावयाच्या मदतीची पीक वर्गवारी व क्षेत्रनिहाय तपशील सर्वेक्षणाद्वारे अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला तातडीचा दिलासा मिळावा, म्हणून ३३ टक्क्यांहून अधिक पीक नुकसान झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट ५ हजार रुपये अग्रीम देण्याचा निर्णय झाला आहे. ही रक्कम लाभहस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

वनपट्टाधारकांसाठी विशेष तरतूद

ज्या वनपट्टाधारक शेतकऱ्यांना अद्याप कृषी नोंदणी ओळख क्रमांक मिळालेला नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना अडचण येऊ नये, म्हणून केवळई-केवायसीच्या आधारेच ही ५ हजार रुपयांची अग्रीम रक्कम वितरित केली जाईल.

पुन्हा ई- केवायसीची गरज नाही

ज्या शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर २०२५ ते आतापर्यंत विविध शासकीय योजनांतर्गत ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांना ही प्रक्रिया पुन्हा करण्याची कोणतीही आवश्यकता भासणार नाही.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा